पोलीसांकडून सर्व बाजुने तपास सुरू
राजापूर (प्रतिनिधी): राजापूर तालुक्यातील कोंड्ये येथील चोरी प्रकरणी राजापूर पोलीसांकडून कसून तपास सुरू असून अद्याप कोणतेच धागेदोरे पोलीसांच्या हाती लागलेले नाहीत. मात्र या प्रकरणी पोलीसांकडून वेगाने तपास सुरू असून लवकरच चोरटयांना जेरबंद केले जाईल असे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे.
राजापूर तालुक्यातील कोंड्ये येथील शिक्षक कॉलनीसह बौध्दवाडी व मधलीवाडी येथील रहिवासी अशोक महाडेश्वर, ॲड. मुरलीधर मोरे, योगेश मोरे, शशिकांत लाड, अविनाश रामचंद्र तावडे अशी पाच बंद घरे फोडुन चोरट्यानी एकूण ४ लाख ४३ हजाराचा ऐवज लंपास केला आहे.
या प्रकरणी पोलीसांनी अज्ञात चोरटयांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या चोरीतील चोरटे हे सराईत चोरटे असावेत असा पोलीसांचा कयास असून त्यादृष्टिने पोलीसांनी तपास सुरू केला आहे. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हयात गेल्या काही दिवसात अशा प्रकारे बंद घरे फोडून झालेल्या चोऱ्यांबाबत माहिती घेताना त्यातील आरोपींची चोरीची पध्दत, त्यात काही साधर्म्य आहे काय याबाबतही खात्री केली जात आहे. तर सर्व तांत्रिक बाजुंनीही तपास केला जात असून लवकरच चोरटे हाती लागतील असा दावा पोलीसांनी केला आहे.








