राजापूर (वार्ताहर): आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात डेटा सायन्ससारख्या अत्याधुनिक आणि महत्त्वाच्या क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत तालुक्यातील कळसवली गावची सुन असलेल्या सौ. अनुष्का जाधव-चव्हाण यांनी ‘डेटा सायन्समध्ये पदव्युत्तर प्रमाणपत्र’ हा नामवंत अभ्यासक्रम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नागपूर (IIM) येथून यशस्वीरित्या पूर्ण करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
हा अभ्यासक्रम डेटा अॅनालिटिक्स, मशीन लर्निंग, पायथोन प्रोग्रॅमिंग, बिझनेस इंटेलिजन्स यांसारख्या तंत्रज्ञानविषयक कौशल्यांवर आधारित असून, उद्योग व सेवा क्षेत्रांतील निर्णयक्षमतेत मोठे योगदान देणारा मानला जातो.
मुळच्या संगमेश्वर येथिल रहिवासी असलेल्या अनुष्का यानी लग्ना पूर्वी एमबीए पर्यंत शिक्षण घेतले असून, नोकरी सांभाळत पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिला कुटुंबाकडून मोठा आधार लाभला. “शिक्षणाला वयाचं बंधन नसतं. शिकल्यामुळे केवळ ज्ञानात भर पडत नाही, तर करिअरच्या नवीन संधीही खुल्या होतात. तरुणांनी बिझनेस क्षेत्राकडे आत्मविश्वासाने पाहायला हवे,” असे विचार त्यांनी व्यक्त केले. या यशस्वीतेनंतर, अनुष्काने डेटा अॅनालिटिक्स व बिझनेस इनसाइट्स क्षेत्रात करिअर घडवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
पदविका प्रदान समारंभात आयआयएम नागपूरचे डायरेक्टर डॉ. भिमराया मेत्री, डिन डॉ. आलोक कुमार सिंग आणि प्रोग्रॅम डायरेक्टर सुजित कुमार शर्मा, प्रोग्रॅम डायरेक्टर निकुंज कुमार जैन यांच्या हस्ते तिला प्रमाणपत्र देण्यात आले.
अनुष्का यांच्या या यशाबद्दल तिच्या कुटुंबीय, शिक्षक आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या या प्रगतीमुळे महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास स्थानिक शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळात व्यक्त होत आहे.











