सिंधुदुर्ग | सिद्धेश सावंत : अलीकडे सोशल मीडियावर यो यो हनी सिंगच्या ‘लाल परी’ गाण्यावर एस.टी. (म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या) बसचे रिल्स प्रचंड व्हायरल होत आहेत. लाल रंगाच्या या पारंपरिक बसेसना ‘लाल परी’ हे प्रेमाने दिलेले नाव, आणि त्यावर हनी सिंगच्या बीट्सवर बनवलेले रिल्स – ही भन्नाट जोडी सध्या नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
विशेष म्हणजे, ‘लाल परी’ हे गाणं हनी सिंगने हाऊसफुल ५ या बॉलिवूड चित्रपटासाठी गायलं आहे. या गाण्यात हनी सिंगसह सिमर कौर यांचं गायन असून, बोल अल्फाज आणि हनी सिंग यांनी लिहिले आहेत. रेमो डिसूझाने कोरिओग्राफ केलेल्या या गाण्याच्या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिस यांच्यासह संपूर्ण स्टारकास्ट एका क्रूझवर थिरकताना दिसतो.
गाण्याच्या लोकप्रियतेचा फायदा सोशल मीडियावर एस.टी. प्रेमींनी उचलून धरला आहे. घाट रस्त्यावर वळणं घेताना, वेगात धावताना किंवा धुरकट रस्त्यावरून जाताना एसटी बस ‘लाल परी’ गाण्यावर थिरकत असल्याप्रमाणे रिल्स बनवले जात आहेत. काही ठिकाणी ड्रायव्हरचा swag, बसचा आवाज आणि सीनिक व्ह्यूज या सगळ्याला बीट्सवर Sync करून सादर केलं जातं – जे पाहणाऱ्यांना एकदम भावतं.












