दोन दिवस पावसाने घातला धुमाकुळ
खेड(प्रतिनिधी)
खेड मध्ये गेल्या दोन दिवसा पासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी दुपार नंतर काहीशी विश्रांती घेतली. या पावसाची दोन दिवस संततधार सुरुच राहिल्याने काही अंशी जनजीवन विस्कळीत झाले तर जगबुडी नदी ५.३० मीटर ही इशारा पातळी ओलांडून वाहत होती. दोन दिवसा पासून संततधार कोसळत असलेल्या पावसाचा रविवारी दुपारनंतर जोर कमी झाला.

गेले दोन दिवस शहरा सह तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले नारिंगी, चोरद व जगबुडी नदी पात्रा तील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली त्यातील भरणे येथील चोरद नदीने सकाळीच १० वाजण्याच्या सुमारास इशारा पातळी ओलांडली होती. त्यामुळे पाणी वाढून शहरात शिरण्याचा धोका कायम होता.
दरम्यान हवामान विभागाने अति मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने येथील प्रशासन अलर्ट मोड वर असून नदी काठच्या गाव वाड्या तसेच खेड शहरातील नागरिक व व्यापारी वर्गाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुपार नंतर पावसाचा जोर ओसरल्याने हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आले आहे.
या पावसामुळे गेल्या दोन दिवसात जनजीवन विस्कळीत झाले असून ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना झालेल्या आहेत. यासंदर्भात तहसीलदार प्रशासनाकडे चौकशी केली असता गावागावात तलाठ्यांमार्फत अद्यापही पंचनामे सुरू आहेत. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही. सायंकाळी पुन्हा पावसाचा जोर वाढला होता
शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास खेड – दापोली मार्गावरील एकविरा चौक परिसरात नारंगी नदीच्या पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. तर काल दुपारच्या सुमारास मुसळधार पावसामुळे खेड – दापोली मार्गावरील फुरुस गावानजीक सुरू असलेल्या मोरीच्या बांधकामा लगत तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या स्वरूपाच्या रस्त्यावरून पाणी जाऊ लागल्याने या मार्गावरील संपूर्ण वाहतूक दुपारनंतर खेड- दस्तुरी – पालगड तिठामार्गे दापोली अशी वळवण्यात आली होती.
मुसळधार पावसामुळे खेड – शिवतर मार्गावरील कोळकेवाडी नजीक एक महाकाय वृक्ष रात्री च्या सुमारास उन्मळून पडल्याने या मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. तर खेड – खोपी मार्गावरील कुळवंडी नजीक एक झाड कोसळल्याने हा मार्ग देखील बंद झाला होता. या ठिकाणी प्रशासनाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने कोसळलेले वृक्ष बाजूला करून ही वाहतूक पूर्ववत केली.













