पहिल्याच दिवशी होणार नवागतांचे स्वागत..

मंडणगड /प्रतिनिधी

पंचायत समिती मंडणगड शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 143 शाळांमध्ये दिनांक 16 जून 2025 रोजी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दीर्घ सुट्ट्यांचा आनंद उपभोगून शाळेत येणाऱ्या बालकांना शाळेची ओढ लागावी, चैतन्य आणि उत्साहवर्धक प्रारंभ होऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाटचालीसाठी गती मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम राबविण्याचे ठरवले आहे. मंडणगड तालुका शिक्षण विभागाने या उपक्रमाची जय्यत तयारी सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी सर्व शाळा हारतुरे, फुगे, फुले आदींनी सजवण्यात येणार असून प्रभात फेरीने वाजत गाजत इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या नवागत मुलांना शाळेमध्ये प्रवेशित केले जाणार आहे. तसेच मुलांचे पुष्प देऊन स्वागत करण्याचे नियोजन प्रत्येक शाळेत करण्यात आले आहे. दुपारी भोजनामध्ये गोड पदार्थाचा समावेश करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आवड निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. मंडणगड तालुक्यात सन 2025/26 या शैक्षणिक वर्षात एकूण 209 विद्यार्थी व 191 विद्यार्थिनी असे एकूण 400 विद्यार्थी इयत्ता पहिले मध्ये दाखल होणार आहेत.इयत्ता पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना 25054 मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येणार असून एकूण 5979 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश यांचे वाटप पहिल्याच दिवशी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे .या कार्यक्रमासाठी मा. तहसीलदार, अक्षय ढाकणे,मा. गटविकास अधिकारी विशाल जाधव तसेच सर्व कार्यालयातील अधिकारी यांच्या शाळा भेटीचे नियोजन पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत करण्यात आलेले आहे .सरपंच ग्रामपंचायत सदस्य, नगरपालिका क्षेत्रात नगरसेवक तसेच परिसरातील सर्व मान्यवर यांच्या हस्ते मुलांना पाठ्यपुस्तके व गणवेश यांचे वाटप करून मुलांचे स्वागत करण्यात येणार आहे .संपूर्ण शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे नियोजन गटशिक्षणाधिकारी सौ .कल्याणी मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी श्री. श्रीकांत बापट, सर्व केंद्रप्रमुख , विषय साधन गट तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांनी नियोजनपूर्वक केले असून राज्य शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण प्रवेशोत्सव कार्यक्रम तालुक्यामध्ये यशस्वी करण्याचे परिपूर्ण नियोजन पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्याद्वारे केले असल्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी सांगितले.