वैभववाडी l प्रतिनिधी : करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. दरड व मातीचा मोठा ढीग रस्त्यावर आला आहे. संबंधित यंत्रणेच्या मार्फत दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मार्ग बंद झाल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या फोंडा व भुईबावडा मार्गे वळविण्यात आल्या आहेत.
दोन दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. नदी व नाले दुथडी भरून वाहत आहेत. अतिवृष्टीचा फटका करूळ घाटाला बसला आहे. आज सकाळी ८ वाजता करूळ घाटात दरड कोसळली. दरडीबरोबर मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर आला आहे. दरड कोसळल्याची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्गाचे वाहतूक पोलीस तसेच ठेकेदार आर.बी. वेल्हाळ कंपनीचे कर्मचारी दाखल झाले आहेत. चार जेसीबीच्या साह्याने दरड व मातीचा ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परजिल्ह्यात जाणाऱ्या एसटी बस या फोंडा घाट मार्गे वळविण्यात आल्या आहेत. तर खाजगी वाहतूक भुईबावडा घाट मार्गे वळविण्यात आली आहे.













