राजापूर पोलीसांकडून खूनाचा गुन्हा दाखल
मात्र खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट
खून्याचा शोध घेण्याचे पोलीसांपुढे आव्हान
राजापूर | प्रतिनिधी : तालुक्यातील रायपाटण टक्केवाडी येथील श्रीमती वैशाली शांताराम शेटे या वृध्द महिलेचा खून झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले असून या प्रकरणी राजापूर पोलीसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र या महिलेच्या अंगावरिल व घरातील सोन्याचे दागिने व अन्य मौल्यवान दस्तऐवज जागेवरच असल्याने नेमका या महिलेचा खून का? कुणी? व कशासाठी? केला असे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे आता खूनाच्या तपासाचे कडवे आव्हान राजापूर पोलीसांपुढे ढाकले आहे.
दरम्यान बुधवारी सायंकाळी उशीरा शवविच्छेदन करून या महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर रात्री उशीरा तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तालुक्यातील पुर्व भागातील रायपाटण टक्केवाडी येथे बुधवारी सकाळी ही खळबळजनक घटना उघड झाली होती. श्रीमती वैशाली शेटे या वृध्द महिलेचा मृतदेहतीच्या राहत्या घरी आढळून आला होता. या घटनेनंतर या परिसरात एकच खळबळ उडाली होती. तात्काळ पोलीस यंत्रणेने या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता. दरम्यान या घटनेने श्वान पथकासह, फॉरेन्सिकची टीम आणि स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाच्या पथक यांनी आपल्या पध्दतीने तपास हाती घेतला आहे. तर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी घटनास्थळी भेट देत पहाणी केली व तपास कामी मार्गदर्शन केले. उपविभागिय अधिकारी सुरेश कदम यांसह राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव हे घटनास्थळी तळ ठोकून या प्रकरणी तपास करत आहेत.
सोमवारी सायंकाळ नंतर वैशाली शेटे या गावात कोणाला दिसल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांचा सोमवारी रात्री अथवा मंगळवारी अशा प्रकारे मृत्यु झालेला असावा असाही पोलीसांचा कयास आहे.
शवविच्छदेनानंतर मृत श्रीमती वैशाली शेटे यांच्या डोक्यावर जखम आढळून आली तर शरीर काळे पडले असल्याचेही दिसून आले. तर घरातील एकूणच परिस्थिती, त्यांचा आढळून आलेला मृतदेह, त्यांच्या घराच्या मागील दरवाजाला बाहेरून लावलेली कडी यावरून पोलीसांनी त्यांचा खून झाला असावा असा निष्कर्ष काढला आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान श्रीमती शेटये यांच्या अंगावरिल दागिन्यांसह घरातील अन्य मौल्यवान वस्तु आहेत तशाच आहेत. त्यामुळे हा खून नेमका कोणत्या कारणासाठी झाला याचा अद्याप उलगडा झालेला नाही. या प्रकरणी पोलीसांकडून वेगवेगळया बाजुंनी पडताळणी केली जात असून खुनाचा तपास केला जात आहे. मात्र अद्याप कोणताही क्लू पोलीसांच्या हाती न लागल्याने या खूनाच्या तपासाचे आव्हान पोलीसांपुढे रहाणार आहे. या प्रकरणी राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव तपास करत आहेत.













