तळे येथे वीज कोसळून घराची वीज जोडणी खाक

वृद्ध महिला बचावली; मुसळधार पावसाने थैमान

खेड (प्रतिनिधी)

तालुक्यात पावसामुळे संततधार अनेकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच खेड तालुक्यातील तळे गावातील उधळवाडी येथे सायंकाळी साडेसातच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. शुभांगी राजाराम कोलम या ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या घरावर वीज कोसळून संपूर्ण घरातील वीज जोडणी जळून खाक झाली.

ही घटना घडली तेव्हा शुभांगीबाई घरात होत्या. वीज कोसळताच ती विद्युत वाहिनीतून घरात प्रवेशली आणि संपूर्ण इलेक्ट्रीक उपकरणे व वायरिंग जळून गेली. विजेच्या प्रवाहामुळे शौचालयाच्या भिंतीला तडे गेले आणि जमिनीला मोठी भेग पडली. या घटनेत शुभांगी यांचा जीवथोडक्यात बचावला असला, तरी त्यांच्या पाठीवर मुका मार बसला आहे.

दुर्दैवाची बाब म्हणजे या घटनेनंतर चोवीस तास उलटून गेले तरी आपत्ती नियंत्रण यंत्रणेकडून कोणत्याहीप्रकारची मदत पोहोचलेली नाही. मुसळधार पावसात कोलम कुटुंबियांना अंधारात दिवस काढावे लागत आहेत. हवामान विभागाने कोकणासाठी रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीयुक्त वातावरण पसरले आहे