आंबोलीत पारंपरिक पद्धतीने पाऊस मोजमाप सुरू करा : दत्तू नार्वेकर 

डिजिटल पाऊस मोजणी यंत्र कुचकामी ठरत असल्याचा आरोप 

आंबोली । प्रतिनिधी : जागतिक महत्त्वाचे पर्जन्यस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली येथील पाऊस मोजणी यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत कार्यालयाच्या छतावर बसवण्यात आलेले डिजिटल पाऊस मोजणी यंत्र कुचकामी ठरत असल्याचा आरोप करत, आंबोलीचे उपसरपंच दत्तू नार्वेकर यांनी आमदार दीपक केसरकर यांच्याकडे पारंपरिक पद्धतीने पाऊस मोजमाप सुरू करण्याची आणि त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शेजारील ग्रामपंचायतीच्या २० गुंठे जागेत यंत्रणा बसवण्याची मागणी केली आहे.

आंबोली हे जगातील सर्वाधिक पावसाच्या पहिल्या तीन ठिकाणांपैकी एक आहे. विशेष म्हणजे, २०१९ मध्ये आंबोलीने मावसिनरामलाही मागे टाकून पावसाचे जागतिक विक्रम नोंदवले होते. ब्रिटीश काळापासून आंबोलीमध्ये पावसाचे मोजमाप सुरू आहे. पूर्वी नाथ जोशी हे काम करत असत आणि गेल्या ४० वर्षांपासून भाऊ ओगले हे काम निष्ठेने करत आहेत. असे असताना, गेल्या वर्षी “डिजिटल” च्या नावाखाली ग्रामपंचायतच्या छतावर बसवण्यात आलेले यंत्र अकार्यक्षम ठरले आहे.

श्री. नार्वेकर यांनी या डिजिटल यंत्राच्या कार्यक्षमतेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते, “एवढ्याशा सौर ऊर्जेवर हे यंत्र २४ तास चालू शकत नाही. अधिकारी बोगस माहिती देत आहेत. आंबोलीतील सततचे धुके आणि पाऊस यामुळे मोठे सौर पॅनलदेखील चालत नाहीत. अनेकदा ३-४ दिवस वीज नसते. अशा वेळी जीपीएसवरून पावसाचे रेकॉर्ड मिळत नाही, हा पूर्णतः फसवापणा आहे. त्यामुळे गेल्या वर्षीचे रेकॉर्ड बरोबर आले नाही.”

पावसाचे रेकॉर्ड आणि नुकसान भरपाई हा महसूल विभागाचा विषय असताना ग्रामपंचायतीकडे हे रेकॉर्ड कसे उपलब्ध होईल, तसेच यंत्र चालू आहे की बंद हे कसे समजेल, असा सवालही नार्वेकर यांनी उपस्थित केला आहे.

अधिकाऱ्यांनी १ जूनलाच यावर विचारविनिमय करणे आवश्यक असताना तसे काही केले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

त्यामुळे तात्काळ हे यंत्र काढून जिल्हा बँके शेजारील २० गुंठे जागेत पारंपरिक मोजणी यंत्रणा बसवावी, अशी त्यांची मागणी आहे. कार्यालयात बसून अधिकाऱ्यांनी स्थानिक वातावरणाची परिस्थिती जाणून घेऊ नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

याव्यतिरिक्त, नार्वेकर यांनी आंबोलीतील गाळाच्या समस्येकडेही लक्ष वेधले. रोजगार हमी योजनेअंतर्गत गाळ काढण्यासाठी यापूर्वीही शासनाकडे प्रस्ताव पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले. वायंगणी शेती ही मालकी तसेच खोती पद्धतीची असल्याने स्थानिक लोकांना रोजगार मिळावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. वन्य प्राण्यांमुळे शेती उद्ध्वस्त झाली असून गाळ भरला आहे.

आंबोलीत पूरपरिस्थिती कधीच नसते, मात्र पिण्याचे पाणी आणि जलसंधारणासाठी नदी क्षेत्र टिकवण्यासाठी गाळ काढण्याची मागणी त्यांनी यापूर्वीही केली आहे.

या सर्व मागण्यांवर आमदार दीपक केसरकर यांनी तातडीने लक्ष देऊन आंबोलीच्या जागतिक महत्त्वाच्या पर्जन्यमानाची अचूक नोंद होण्यासाठी योग्य उपाययोजना करावी, अशी अपेक्षा आंबोलीवासीय व्यक्त करत आहेत.