खेड बसस्थानकातील उपाहारगृह कुलूप बंदच

प्रवाशांची हेळसांड कायम, प्रशासनाच्या उदासिनतेवर प्रश्नचिन्ह

 

खेड(प्रतिनिधी)

खेड बसस्थानकातील बंदावस्थेतील उपाहारगृह चर्चेचा विषय ठरले आहे. अजूनही या उपाहारगृहाचे कुलूप उघडलेले नाही. यामुळे प्रवाशांची हेळसांड होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांनाही बंदावस्थेतील उपाहारगृहाचा फटका बसत आहे. एसटी प्रशासन उपाहारगृह खुले करण्यासाठी पुढाकारच घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उपाहारगृहाचे कुलूप उघडण्याचे घोडे नेमके अडले कुठे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

गेल्या दीड वर्षांपासून एसटीच्या उपाहारगृहाला ठोकण्यात आलेले टाळे अजूनही अजूनही जैसे थेच आहे. उपाहारगृह बंद असल्याने सकाळच्या सुमारास प्रवाशांसह चालक-वाहकांचेही हाल होतात. नजिक असणारे हॉटेल्स व टपऱ्याही सकाळच्या सुमारास बंद असतात.यामुळे चहा अथवा नाष्टा करायचा कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकतो. ठेकेदाराने उपाहारगृहाचे भाडे थकवल्याने उपाहारगृहाला कुलूप लावण्याचे सांगण्यात आले होते.

मात्र, संबंधित ठेकेदाराने उपाहारगृहाचे कोणतेही भाडे थकवल्याचे नसल्याचे स्पष्ट करत नाहक बदनामी केल्यास अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन छेडण्याची तंबी दिली होती. उन्हाळी हंगामातही उपाहारगृह बंदच होते. अजूनही उपाहारगृह खुले करण्याच्या दृष्टीने कुठल्याच हालचाली सुरू नाहीत. यामुळे प्रवाशांची हेळसांड कायमच आहे. त्यामुळे एसटी प्रशासन उपाहारगृह खुले करण्यासाठी जागे होणार कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.