रोटरी स्कूल, खेड येथे भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती उत्साहपूर्वक साजरी

खेड (प्रतिनिधी) – रोटरी स्कूल, खेड येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सोमवार, १७ नोव्हेंबर २०२५ रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आदिवासी समाजाचे क्रांतिकारी नेते, महान स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक असलेल्या बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत शाळेने भव्य रॅली काढून अभिवादन केले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख, फलक आणि घोषणांद्वारे त्यांच्या कार्याला उजाळा देत देशभक्तीचा संदेश दिला.
कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभागप्रमुख श्री. राहुल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख श्री. शैलेश देवळेकर, प्राथमिक विभागप्रमुख सौ. तेजश्री कानडे, पूर्वप्राथमिक विभागप्रमुख सौ. प्रितम वडके, शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना आणि इतिहासाविषयी कुतूहल निर्माण करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. या प्रसंगी शिक्षिका मिनाक्षी निवाते यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की बिरसा मुंडा यांची जयंती दरवर्षी १५ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाते. त्यांच्या आयुष्याचा प्रवास हा संघर्ष, समाजजागृती आणि जनआंदोलनाने भरलेला होता. त्यांनी ब्रिटिश सत्तेविरोधात तसेच जमीनदारांच्या अन्यायकारक शोषणाविरुद्ध “उलगुलान” या ऐतिहासिक चळवळीचे नेतृत्व केले. देशातील आदिवासी समाजाला एकत्र आणत त्यांनी सामाजिक व धार्मिक सुधारणांचा संदेश दिला. त्यांच्या कार्याची शौर्यगाथा स्मरणात ठेवण्यासाठी भारत सरकारने १५ नोव्हेंबर हा दिवस “जनजाती गौरव दिवस” म्हणून घोषित केल्याची माहितीही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीदरम्यान परिसरात ऐकू येणाऱ्या घोषणांनी देशभक्तीचा रंग अधिक गडद झाला. शाळेच्या सर्व विभागांनी एकदिलाने सहभाग नोंदवत हा उपक्रम यशस्वी करण्यात सहकार्य केले.