दशावतार कलाकार संघटनेसाठी आमदार निलेश राणे यांची ‘लाख’ मोलाची मदत

शिवसेना वर्धापन दिनाचे औचित्य : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते दशावतार कलाकाराना मदत सुपूर्द

अमित खोत | मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकार स्थापन करत असलेल्या संघटनेसाठी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आमदार निलेश राणे यांच्या वतीने जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते एक लाख रुपये मदत घुमडे येथील घुमडाई मंदिरात उपस्थित दशावतार कलावंत यांना सुपूर्द करण्यात आली.

 

दशावतार कलावंत न्याय हक्कासाठी संघटना स्थापन करत आहेत. जिल्ह्यातील कलाकार एकत्र येत आहेत. या संघटनेला शुभारंभाची मदत आमदार निलेश राणे यांच्या वतीने देण्यात येत असल्याचे असल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले. यावेळी उपस्थित दशावतार कलावंत यांच्या वतीने आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच मदतीबद्दल दत्ता सामंत यांचा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी पुरुषोत्तम खेडेकर, महेश गावडे, पप्पू नांदुस्कर, चंदू खोत, दत्तप्रसाद शेणई, उदय कोणासकर, उल्हास नाईक, मामा माळकर, प्रशांत मेस्त्री, पवन वालावलकर, गौरव शिर्के, प्रशांत मयेकर, सुभाष लोंढे, शानू वालावलकर यांसह जिल्ह्यातील दशावतार कलाकार उपस्थित होते.

 

दशावतार कलावंतांचे वर्षानुवर्षे अनेक प्रलंबित प्रश्न होते. हे प्रश्न समजून घेत, त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने मागील महिन्यात मुंबई येथे सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपारिक दशावतार लोककलाकारांच्या समस्यांबाबत बैठक माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, या बैठकीत आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकारांच्या विविध समस्या व मागण्या मांडल्या. सकारात्मक चर्चा करून अनेक प्रश्न मार्गी लावले. दशावतार कलावंत यांना न्याय देण्याच्या दृष्टीने व राजश्रय मिळवून देण्यासाठी आमदार निलेश राणे सातत्याने प्रयत्नशील आहेत. अनेक बाबतीत न्याय मिळवून दिला आहे.याबाबतही कलाकारांनी विशेष आभार व्यक्त केले.

 

*लवकरच आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत मेळावा*

 

लवकरच आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दशावतार कलाकार संघटनेचा मेळावा होणार आहे. असे सांगत दशावतार कलाकार यांनी आमदार निलेश राणे तसेच दत्ता सामंत यांच्या दातृत्वाचे व कार्याचे कौतुक केले. आम्ही दशावतारी कलेतील राजा तर खरा राजा दत्ता सामंत हे ही आहेत. आमच्या प्रत्येक संकटात ते धावून येतात. सोबतच आमचे अनेक वर्षांचे प्रश्न आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मंत्रालय स्तरावर मांडण्यात आले. आम्हाला न्याय देताना आर्थिक मदत देऊन आमची संघटना बळकट करणारे आमदार निलेश राणे व दत्ता सामंत यांचे विशेष आभार दशावतार कलाकार यांनी व्यक्त केले.