सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गनगरी येथील हॉटेल राजधानीसमोरील महामार्गावर गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका अशोक लेलँड टेम्पोवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत तब्बल ८० लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्या निर्देशानुसार, पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दोन विशेष पथके गोवा बनावटीच्या दारूच्या अवैध वाहतुकीवर लक्ष ठेवून होती. ही पथके सावंतवाडी उपविभागात गस्त घालत असताना, मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार एक अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो क्रमांक (डीडी -०१-AA-९६४८ ) मधून गोवा येथून मुंबईच्या दिशेने दारूची वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे दोन्ही पथकांनी ओरोस येथील राजधानी हॉटेलजवळ सापळा रचला.
संबंधित टेम्पो हॉटेल राजधानीसमोर आल्यानंतर त्याला थांबण्याचा इशारा देण्यात आला. चालकाकडे गाडीतील मालाबाबत विचारणा केली असता, त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, अधिक विश्वासात घेऊन विचारणा केल्यावर त्याने गाडीमध्ये गोवा बनावटीचे दारूचे बॉक्स असल्याचे कबूल केले.
याप्रकरणी आरोपी राघोबा रामचंद्र कुंभार (वय ३५, रा. पेडणे, माऊसवाडी, गोवा) याला ताब्यात घेण्यात आले. तर त्याने दिलेल्या माहितीनुसार संशयित मिलींद राणे (रा. इन्सुली, ता. सावंतवाडी) याच्या सांगण्यावरून तो ही दारूची वाहतूक करत होता असे स्पष्ट झाले.
पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली असता, त्यामध्ये ५५ लाख ७५ हजार ६८० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आढळून आली. दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या अशोक लेलँड टेम्पोची किंमत २५ लाख रुपये आहे. अशा प्रकारे एकूण ८० लाख ७५ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २८/२०२५ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ), (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस करत आहेत.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक श्री. सचिन हुंदळेकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. समीर भोसले, स्थानिक गुन्हे शाखा, श्री. गणेश कऱ्हाडकर, सायबर पोलीस ठाणे, श्री. रामचंद्र शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हेडकॉन्स्टेबल डॉमनिक डिसोझा, सदानंद राणे, प्रकाश कदम, किरण देसाई, बस्त्याव डिसोझा, जॅक्सन घोन्साल्वीस, आणि पोलीस कॉन्स्टेबल महेश्वर समजिस्कर यांनी केली आहे.












