*निलेश जाधव / देवरूख* संगमेश्वर तालुक्यातील आंगवली गावचे प्रमुख मानकरी व श्री मार्लेश्वर देवस्थान (आंगवली) ट्रस्टचे विश्वस्त श्री. प्रदीप मनोहर अणेराव (बबन) यांचे शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनाने आंगवली गावावर शोककळा पसरली आहे.
प्रदीप अणेराव हे आंगवली गावात ‘बबन’ या टोपण नावाने ओळखले जात होते. ते अतिशय शांत, प्रेमळ व सुस्वभावी होते. गावच्या प्रत्येक कार्यक्रमात ते अगदी हिरहिरीने सहभागी होत असत. इतकेच नव्हे तर सर्वांना सोबत घेवून त्यांची काम करण्याची पध्दत वाखणण्याजोगी होती. मुंबईतून आपल्या गावी आल्यावर ते सर्वांची अदबीने विचारपूस करत असत. आपल्या प्रेमळ स्वभावाने त्यांनी सर्वांना आपलेसे केले होते. अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची गावात ओळख होती. आजपर्यंत त्यांनी कोणाला दुखावले नाही. आपल्या गोड वाणीने त्यांनी गावातील प्रत्येकाच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.
मार्लेश्वर-गिरिजादेवीच्या विवाहसोहळ्यात मार्लेश्वराचा चांदीचा टोप मांडीवर घेण्याचा मानही त्यांच्याकडे होता. त्यामुळे या विवाहसोहळ्यात त्यांना मानाचे स्थान होते. आंगवली गावचे ते प्रमुख मानकरी असल्यामुळे आपली जबाबदारी ते अतिशय चांगल्याप्रकारे पार पाडत असत. आंगवलीतील श्री मार्लेश्वर देवस्थानचे ते विश्वस्त होते. गावच्या कारभारात ते जातीनीशी लक्ष घालीत असत. मुंबईतील वसई येथे ते वास्तव्यास होते. शुक्रवारी सायंकाळी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी आंगवली गावात समजताच सर्वांनी हळहळ व्यक्त केली. गावातील अजातशत्रू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्यावर शुक्रवारी रात्री मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंड असा परिवार आहे.












