डोंगरातील दगड सैल झाल्याने दगड डोक्यात पडून सहा वर्षीय चिमुकलीचा नाहक बळी
संबंधित ठेकेदाराचा बेजबाबदारपणा की प्रशासनाचे दुर्लक्ष? स्थानिक ग्रामस्थांमध्ये उसळली संतापाची लाट
निलेश जाधव / देवरूख
राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र मार्लेश्वर येथे दत्तमंदिराकडे जाण्यासाठी फुटब्रिज उभारण्याचे काम सुरू आहे. यासाठी सुरूंग स्फोट घडवून आणले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे. या स्फोटांमुळे सह्याद्रीच्या डोंगराला हादरे बसत असून, डोंगरातील दगड सैल होऊन खाली येत असल्याची चर्चा स्थानिक ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. अशातच आज शुक्रवारी डोंगरावरून दगड पडून सांगली येथील सहा वर्षीय ऋत्वी पाटील या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या दुर्घटनेमुळे मार्लेश्वर दर्शनासाठी व येथील पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या भाविक व पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संबंधित ठेकेदाराचा कथित बेजबाबदारपणा आणि प्रशासनाचे दुर्लक्ष याविरोधात स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
मार्लेश्वर देवस्थान परिसरातील दत्तमंदिराकडे जाण्यासाठी भाविकांच्या सोयीच्या दृष्टीने फुटब्रिज उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, या कामासाठी सुरूंग स्फोट घडवून आणले जात असल्याने परिसरातील नैसर्गिक डोंगररचनेवर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये निसर्गरम्य ठिकाणी मार्लेश्वर देवस्थान वसले आहे. येथील उंच डोंगर, कातळकडे आणि निसर्गरम्य परिसर भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत. अशा संवेदनशील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये बांधकाम करताना अत्यंत काळजीपूर्वक नियोजन, सुरक्षिततेचे नियम आणि पर्यावरणीय बाबींचे पालन करणे आवश्यक असते. मात्र, फुटब्रिजच्या कामादरम्यान करण्यात येणाऱ्या सुरूंग स्फोटांमुळे सह्याद्रीच्या डोंगरातील दगड सैल होत असल्याची भीती व्यक्त होत आहे. स्फोटांच्या तीव्रतेमुळे सह्याद्रीला हादरे बसून डोंगरावरून दगड खाली येण्याचे प्रकार वाढले आहेत. आज शुक्रवारी सांगली येथून कुटुंबासमवेत मार्लेश्वर दर्शनासाठी आलेल्या सहा वर्षीय ऋत्वी पाटील या चिमुकलीचा डोंगरावरून दगड पडून दुर्दैवी मृत्यू झाला. दर्शनासाठी आलेल्या पाटील कुटुंबावर काळाने घाला घातल्याने आनंदाचे वातावरण क्षणात शोकाकुल झाले. या दुर्घटनेत ऋत्वीचे वडील व काका हे जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीचा अशा प्रकारे नाहक बळी गेल्याने भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेने मार्लेश्वर देवस्थान परिसरातील भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. डोंगरावरून दगड कोसळण्याची घटना ही केवळ नैसर्गिक दुर्घटना म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. देवस्थान परिसरात सुरू असलेल्या फुटब्रिजच्या बांधकामासाठी केले जाणारे सुरूंग स्फोट, डोंगराची स्थिती आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची सखोल तपासणी होणे आवश्यक आहे. मार्लेश्वर येथे सुरू असलेल्या फुटब्रिजच्या कामासाठी सुरूंग स्फोट घडवून आणताना आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. बांधकामाच्या ठिकाणी भाविकांची वर्दळ असताना स्फोटांचे नियोजन कशा पद्धतीने केले जाते? डोंगरातील दगड सैल होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत का? भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कोणती व्यवस्था केली आहे? असे अनेक प्रश्न स्थानिक ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
फुटब्रिजचे काम करणाऱ्या ठेकेदाराने सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र त्यामध्ये कोणतीही हयगय होत असल्यास त्याची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. संबंधित विभागाने सुरूंग स्फोटांच्या प्रक्रियेची तपासणी करावी, अशीही मागणी केली जात आहे. ऋत्वी पाटील या चिमुकलीच्या मृत्यूने स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मार्लेश्वर हे धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून, येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. अशा ठिकाणी भाविकांच्या जीविताला धोका निर्माण होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. फुटब्रिजच्या कामासाठी सुरूंग स्फोट घडवून आणण्याच्या प्रक्रियेची तातडीने चौकशी करण्यात यावी. डोंगरातील दगड सैल होण्यामागील कारणांचा तांत्रिक तपास करण्यात यावा. दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. फुटब्रिजचे काम भाविकांच्या सोयीसाठी होत असले, तरी त्या कामामुळे भाविकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. बांधकाम पूर्ण होण्यापेक्षा भाविकांचा जीव सुरक्षित राहणे अधिक महत्त्वाचे आहे. मार्लेश्वर येथील दुर्घटनेनंतर प्रशासनाने तातडीने घटनास्थळाची पाहणी करून सुरूंग स्फोटांच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.













