खेडमध्ये प्राथ. शाळांतील २१ वर्गखोल्या धोकादायक स्थितीत

दुरूस्तीसाठी ३९ लाखांचा खर्च अपेक्षित, खेड शिक्षण खात्याकडून मंजुरीसाठी प्रस्ताव सादर
खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या काही इमारती धोकादायक स्थितीत असल्याने विद्यार्थ्यांची बसण्याची गैरसोय निर्माण झाली आहे. २१ वर्गखोल्या धोकादायक स्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे. या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी ३९ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करून देण्याबाबत तालुका शिक्षण खात्याकडून रितसर प्रस्ताव प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आल्याचे समजते.
तालुक्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांच्या दयनीय अवस्थेमुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या हळूहळू कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. धोकादायक स्थितीतीलशाळांमध्ये पाल्याला पाठवायचे कसे, असा प्रश्न पालकांसमोर उभा ठाकत आहे. वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी त्या त्या गावातील पालकांनी अनेकदा उपोषणाचा मार्ग देखील स्वीकारला होता. यादरम्यान, वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आल्याबाबतचे आश्वासन पालकांना दिल्यानंतर उपोषणे तूर्तास स्थगित केली होती.
गेल्या आठवडाभरापासून प्राथमिक शाळा गजबजल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ देखील सुरू आहे. यामुळे धोकादायक स्थितीतील वर्गखोल्यांना धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे विद्याव्यांना वर्गखोल्यांमध्ये जीव मुठीत धरूनच धडे गिरवावे लागत आहेत. धोकादायक स्थितीतील वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्धतेबाबत प्रस्ताव पाठवून ३ महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्याप दुरुस्तीच झाली नसल्याने पालकांची धास्ती कायमच आहे.
धोकादायक स्थितीतील शाळांमध्ये  क्र. ३ मधील ४ खोल्यांचा समावेश आहे. या खोल्यांच्या दुरुस्तीसाठी ८ लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे. कोतवली नं. २ मधील २ वर्गखोल्यांसाठी ३ लाख, नांदगाव-मराठी शाळेच्या ३ वर्गखोल्यांसाठी ६ लाख, म्हाळुंगेच्या २ वर्गखोल्यांसाठी ४ लाख, तुळशी खुर्द  एका वर्गखोलीसाठी दीड लाख, संगलट-बौद्धवाडीच्या एका वर्गखोलीसाठी दीड लाख, सुकिवली नं.१ मधील ४ वर्गखोल्यांसाठी ७ लाख रुपये, कुंभाड नं.१ मधील एका वर्गखोलीसाठी २ लाख तर निळीक मराठी शाळेच्या एका वर्गखोलीसाठी २ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
पुरे बुद्रुक प्राथमिकच्या विद्यार्थ्यांची पर्यायी बैठक व्यवस्था
गतवर्षीच्या अतिवृष्टीत पुरे बुद्रुक प्राथमिक शाळेचा पाया जमिनदोस्त झाल्याने विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. यंदाही विद्यार्थ्यांची पर्यायी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या शाळेच्या इमारतीसाठी अद्याप निधीच उपत्तव्य झाला नसल्याची बाब समोर आली आहे. या शाळा इमारतीच्या दुरुस्तीचा प्रस्तावही वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आल्याचे समजते.