विक्रांत सावंत यांची उपस्थिती: युवा खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी | प्रतिनिधी: काँग्रेस नेते विकासभाई सावंत यांच्या ६२व्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथे २१ वर्षांखालील मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तीन तालुक्यांसाठी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत पहिली ते कॉलेजमधील ८२ मुलांनी सहभाग नोंदवला.
ना. भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान आणि मुक्ताई अकॅडमी यांच्या मार्गदर्शनाखाली राणी पार्वती देवी शाळेच्या नवरंग सभागृहात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन विकासभाईंचे सुपुत्र आणि युवा उद्योजक विक्रांत सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अमोल सावंत, राणी पार्वती देवी शाळेचे माजी मुख्याध्यापक बाळासाहेब नंदीहळ्ळी, मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर, शांतिनिकेतन शाळेचे मुख्याध्यापक समीर परब, आणि मुक्ताई अकॅडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी विक्रांत सावंत यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आणि विकासभाईंच्या कार्याविषयी तसेच त्यांच्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. मुलांसाठी मुक्ताई अकॅडमी करत असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले आणि भविष्यात मुक्ताई अकॅडमीच्या माध्यमातून मुलांसाठी आणखी काही उपक्रम राबवण्याची घोषणा केली. उपस्थित सर्व मान्यवरांनी मुलांना शुभेच्छा दिल्या आणि असे उपक्रम वेळोवेळी आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली.
कौस्तुभ पेडणेकर यांनी अकॅडमीच्या उपक्रमांची माहिती दिली आणि पुढील महिन्यात कॅरम व बुद्धिबळाची जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याचे जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनानाथ वारंग यांनी केले.











