सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

चिपळूण (वार्ताहर) : परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मिडीअम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये दि. २५ जून रोजी इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी डॉ. सागर पाटील यांचा परिचय प्रशालेच्या माध्यमिक विभागातील सहाय्यक शिक्षिका आणि कार्यक्रम विभाग प्रमुख सौ. स्नेहा भागवत यांनी थोडक्यात करून दिला. बारावी विभागातील पहिल्या नऊ गुणवंत विद्यार्थ्यांचा आढावा प्रा. अरुसा बेबल यांनी घेतला तर दहावी विभागातील पहिल्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा आढावा सौ. स्नेहा भागवत यांनी घेतला. त्यानंतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले . गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशामागील प्रेरणा व अनुभव शेअर केले . तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख सौ .शैलजा देवरुखकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या जीवनामध्ये अभ्यास किती महत्त्वाचा आहे याचे महत्त्व सांगितले तर डॉ. सागर पाटील यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी भवितव्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन प्रशालेच्या माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. पद्मजा येसादे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरुसा बेबल व सौ. स्नेहा भागवत यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. स्नेहा भागवत यांनी मानले. या कार्यक्रमास शाळेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर सत्कार सोहळा सर्वांच्या सहकार्याने अतिशय यशस्वीरित्या पार पडला.