आंबोली: आंबोली येथील कावळेसाद पॉईंटवर काल, शुक्रवारी सायंकाळी दरीत कोसळलेल्या राजेंद्र बाळासो सनगर (वय ४५, रा. कोल्हापूर) यांचा मृतदेह आज अखेर शोध पथकांना सापडला. सुमारे १५० फूट खोल दरीत हे पार्थिव आढळून आले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) टीम, आंबोली बचाव पथक आणि सांगली बचाव पथकाच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र सनगर हे शुक्रवारी सायंकाळी कावळेसाद पॉईंटवरील रेलिंगला टेकून फोटो काढत असताना, अचानक तोल जाऊन सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळले. दाट धुके आणि अंधारामुळे काल रात्री शोध मोहीम राबवणे शक्य झाले नव्हते.

आज, शनिवारी सकाळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ शोध मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेत स्थानिक आंबोली रेस्क्यू टीम, सांगली येथील बाबल अल्मेडा रेस्क्यू टीम आणि सिंधुदुर्ग ओरोस येथील एनडीआरएफची टीम सहभागी झाली होती. तसेच, पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी देखील घटनास्थळी उपस्थित होते. सह्याद्री ॲडव्हेंचरस आणि रेस्क्यू ग्रुप आंबोली आणि सांगली यांच्या मदतीनेही शोधकार्य सुरू होते.
अखेरीस, अथक प्रयत्नांनंतर राजेंद्र सनगर यांचा मृतदेह दरीत १५० फुटांवर आढळला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. यावेळी पोलीस सहाय्यक निरीक्षक, हवालदार दीपक शिंदे, तसेच कोल्हापूर शिक्षण विभाग जिल्हा परिषद कर्मचारी, नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कावळेसाद हे पर्यटन स्थळ स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी स्पष्ट केले.










