उत्पादन शुल्क चे काम करतायत खेड पोलीस

५ महिन्यात ४२ गावठी दारूधंद्यांवर धाडी!
मेमध्ये २२ धाडींची सर्वाधिक नोंद, लाखोंचा ऐवज हस्तगत

खेड(प्रतिनिधी) गावठी दारूच्या हातभट्ट्यांचे तळ उद्धवस्त करण्यासह अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम खेड पोलिसांकडून जोमात सुरू आहे. गेल्या पाच महिन्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या ४२ गावठी हातभट्टीच्या दारूयंद्यांवर धाडी टाकून येथील लाखोंचा ऐवज जप्त केला आहे.वास्तविक येथील उत्पादन शुल्क ने मोहिम हाती घेण्याची गरज असताना खेड पोलीस हे तळ उध्वस्त करत आहेत

जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने धाड मोहीम तीव्र केली आहे. तालुक्यात जंगलमय भागांसह नदीकिनारी गावठी दारूच्या हातभट्ट्या धगधगत आहेत. या हातभट्ट्यांवर विशेषतः सकाळच्या सुमारास कोणत्याही क्षणी धाडी टाकून हातभट्ट्या उद्धवस्त केल्या जात आहे. रात्री-अपरात्री चालणाऱ्या हातभट्ट्यांना पोलिसांकडून लक्ष्य केले जात आहे.

शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे सुरू असणाऱ्या हातभट्टीच्या दारूधंद्यांवर कोणत्याही क्षणी छापा टाकून संबंधितांना पोलिसांचा दणका बसत आहे. तालुक्यात तिसंगी, खोपी-गोरेवाडी, कुळवंडी-देऊळवाडी, गुणदे, पुरे बुद्रुक, वावेतर्फे नातू यासह अन्य ठिकाणी गावठी दारूची धगधुगणारी मुख्य केंद्रे आहेत, पोलिसांनी अचानक घटनास्थळी पोहचून अशा गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्धवस्त करण्याची मोहीम फत्ते केली आहे. या व अशा दारू व्यावसायिकांचे कंबरडे मोडण्याचे काम जोमात सुरू असल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.

पाच महिन्यात तब्बल ४२ धाडी टाकून ४२ जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत. मे महिन्यात २२ दारूधंद्यांवर कारवाया करत लाखोंचा ऐवज जप्त केला. जानेवारीत ७, फेब्रुवारीत ६, मार्चमध्ये ३ तर एप्रिलमध्ये ४ गावठी दारू विकणाऱ्याांना पोलिसांनी दणका दिला. गेल्या २५ दिवसातही १५ हून अधिक दारू व्यावसायिक कारवाईच्या कचाट्यात अडकले आहेत.