यंदाही कॉलेज बाहेरील रस्त्याची दुर्दशा; अभाविपचा आंदोलनाचा इशारा

रत्नागिरी:

रत्नागिरीतील प्रसिद्ध गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या समोरील श्री अरुआप्पा जोशी मार्गावरील रस्त्यावर खड्यांचे राज्य उभे राहिले आहे. गेली काही वर्षे हा रस्ता दरवर्षी असाच खड्डेमय असतो. परंतू प्रशासनाचे मात्र ह्या गंभीर बाबी कडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे कॉलेजमध्ये येणारे विद्यार्थी त्रस्त होत आहेत. खड्यातील चिखलाचे पाणी विद्यार्थ्यांच्या कपड्यावर उडते आणि तसेच वर्गामध्ये बसावे लागते.रस्ता चिखलाने व्यापलेला असल्याने विद्यार्थ्यांना चालायलासुद्धा जागा उरलेली नाही. हा रस्ता रत्नागिरी नगरपालिका हद्दीत येत असून पालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) दक्षिण रत्नागिरीच्या वतीने उपमुख्याधिकारी यांना आज सोमवार दिनांक ३० जून रोजी रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निवेदन देण्यात आले आहे. यावेळी सात दिवसात रस्त्याच्या डागडुजीबद्दल निर्णय नाही घेण्यात आला तर अभाविपकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.