झोळंबे गावात हत्तींकडून माड बागायतीची नुकसानी

दोडामार्ग : प्रतिनिधी
तालुक्यातील झोळंबे गावात हत्तीच्या कळपाने नुकसानीचा उच्छाद मांडला आहे. हत्तींच्या कळपाने झोळंबे गावाकडे आपला मोर्चा वळविला असून शेती बागायतीचे अतोनात नुकसान केले आहे. येथील अमोल महाले यांच्या बागायतीचे कुंपण तोडून हत्तींच्या कळपाने बागेतील काजू, नारळ, केळी या झाडांचे नुकसान केले आहे.

कोलझर, तळकट परिसरात जंगली हत्तींच्या कळपाचा वावर गेले काही दिवस आहे. या परिसरातील समृद्ध शेती बागायतीची हत्तींच्या कळपाने अतोनात हानी केली आहे. मंगळवारी रात्री हत्तींच्या कळपाने आपला मोर्चा झोळंबे गावात वळविला.

येथील अमोल महाले यांच्या बागायतीचे काटेरी कुंपण तोडत हत्तींनी प्रवेश केला. बागायतीमधील १३ नारळ, २ जांभूळ व एक फणसाचे झाड हत्तींनी मुळापासून तोडून टाकले. बागायती मधील काजू तसेच केळींची देखील हानी केली. या परिसरातच हत्तींनी ठाण मांडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अमोल महाले यांनी झालेल्या नुकसानीबाबत दोडामार्ग वनविभागाला पत्र दिले. वनविभागाचा नुकसानीचा पंचनामा न झाल्याने नुकसानीचा नेमका आकडा प्राप्त झाला नाही. वनविभागाने नुकसानीचा पंचनामा करून जंगली हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.