जी.आय.टी.मध्ये “ए.आय क्रांती ” या विषयावर डॉ. अरुण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन

चिपळूण (प्रतिनिधी) : लवेल (ता. खेड) येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनिरिंग (एआयएमएल) विभागाच्या वतीने “ए.आय क्रांती” या विषयावर एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते . हे व्याख्यान थडोमल सहानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अरुण कुलकर्णी यांनी दिले.
कार्यक्रमाची सुरुवात विभागप्रमुख प्रा. सचिन लाटकर यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करून झाली. त्यांनी डॉ. कुलकर्णी यांना पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. कुलकर्णी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या तंत्रज्ञानाची मूलभूत माहिती दिली आणि या तंत्रज्ञानामुळे जगभरात कशाप्रकारे आमूलाग्र बदल घडत आहेत, हे विविध उदाहरणांच्या आधारे स्पष्ट केले. ए.आय. हे केवळ संगणक क्षेत्रापुरते मर्यादित न राहता आरोग्य, शिक्षण, वित्तीय सेवा, वाहतूक, कृषी आणि उत्पादन उद्योग या विविध क्षेत्रांत क्रांती घडवत आहे, असे त्यांनी नमूद केले.
विशेषतः मशीन लर्निंग, डीप लर्निंग, आणि जनरेटिव्ह ए.आय. या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आज मोठ्या प्रमाणावर नवे उपाय निर्माण होत आहेत. डॉ. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना ए.आय. क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबतही माहिती दिली आणि त्यांना नवकल्पना व संशोधन याकडे वळण्याचे आवाहन केले. त्यांनी आपल्या सखोल ज्ञानाने आणि अनुभवाने विद्यार्थ्यांना प्रेरित केले. विद्यार्थ्यांसमोर ए.आय. क्षेत्रातील संशोधन संधी, स्टार्टअप कल्पना, प्रकल्प विकास यावरही त्यांनी प्रकाश टाकला. “ए.आय. हे भविष्यातील इंजिनिअरिंगचे केंद्रबिंदू आहे. हे क्षेत्र निवडताना केवळ सॉफ्टवेअर कौशल्य नव्हे तर तपशीलवार विश्लेषण, सर्जनशील विचार आणि सामाजिक भान देखील आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचा समारोप विभागाच्या प्रा. वरदा कोलगे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. त्यांनी डॉ. कुलकर्णी यांचे बहुमूल्य मार्गदर्शनासाठी मनःपूर्वक आभार मानले. या कार्यक्रमाला विभागातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते. व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून ए.आय. विषयावरील आपली उत्सुकता व्यक्त केली. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत माहितीपूर्ण व प्रेरणादायी ठरला.