जेईई परीक्षेतील यशाबद्दल अनुजा देसाईचा नवोदय अलुमनी असोसिएशनकडून सत्कार

 

सावंतवाडी । प्रतिनिधी : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, दोडामार्ग येथील हेवाळे गावची सुकन्या आणि सांगेली नवोदय विद्यालयाची विद्यार्थिनी अनुजा मनोहर देसाई हिने जेईई (JEE) सारख्या कठीण परीक्षेत दैदीप्यमान यश मिळवून संपूर्ण देशात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या यशामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

अनुजाची ही यशोगाथा केवळ जेईई पुरती मर्यादित नाही. यापूर्वीही तिने दहावी, बारावी, सी.एस.आर.एल., आणि आय.आय.टी. यांसारख्या विविध परीक्षांमध्ये नेत्रदीपक यश संपादन केले आहे. तिच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि मेहनतीची दखल म्हणून तिला ‘सकुरा सायन्स एक्सचेंज प्रोग्राम’ अंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी जपानला जाण्याची संधी मिळाली होती.

दिवसातील तब्बल १८ तास अभ्यास करणाऱ्या अनुजाच्या या भगीरथ प्रयत्नांचे सावंतवाडी येथील माजी नवोदय अलुमनी असोसिएशनने कौतुक केले आहे. याच प्रशालेत शिक्षण घेऊन सध्या विविध पदांवर कार्यरत असलेल्या असोसिएशनच्या माजी विद्यार्थ्यांनी अनुजाची भेट घेतली आणि तिचा विशेष सत्कार करून तिला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. अनुजाच्या ज्ञानगंगेचा हा खळाळणारा प्रवाह असाच विस्तारत राहावा, अशी सदिच्छा या वेळी व्यक्त करण्यात आली.

या सत्कारप्रसंगी डॉ. निर्मला सावंत, परमेश्वर सावळे, मयुरेश राऊळ, अमित लिंगवत, हर्षवर्धन बोरवडेकर, सुनील सोन्सुरकर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. त्यांनी अनुजाच्या यशाचे कौतुक केले आणि तिला भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.