गौरव पोंक्षे l माखजन : प्रत्येक व्यक्तीला जीवनात यशस्वी होताना,कुणाचे ना कुणाचे अनमोल मार्गदर्शन मिळत असते.या यशस्वी जीवनाचा खरा शिल्पकार हा गुरूच असतो असे प्रतिपादन माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर साठे यांनी केले ते माखजन इंग्लिश स्कूल च्या गुरुदक्षिणा सभागृहात आयोजित गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात बोलत होते.
ते पुढे म्हणाले की गुरु हा मूळ संस्कृत शब्द आहे.गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे प्रकाश.अज्ञानाच्या आधारकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेतो तो गुरु.प्रत्येकाच्या जीवनात गुरुंना अनन्यसाधारण महत्व आहे.प्रत्येकाच्या जीवनात कुणीतरी गुरू असतोच,जसे श्रीकृष्णासाठी संदीपनी ऋषी तर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी समर्थ रामदास स्वामी असे अनेक दाखले देता येईल.गुरूने दाखवलेल्या वाटेवरून प्रामाणिक प्रयत्न केले तर प्रत्येक व्यक्ती जीवनात यशस्वी होऊ शकते असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेचे माजी विद्यार्थी अद्वैत पेंडसे याने देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तो नुकताच सी.ए ची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला.जीवनात यश प्राप्त करण्यासाठी गुरूंचे मार्गदर्शन व अपार मेहनतीची गरज असल्याचे विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना नमूद केले.या कार्यक्रमावेळी माजी निवृत्त पर्यवेक्षक भालचंद्र बापट यांनी मार्गदर्शन केले.संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन ज्येष्ठ शिक्षक संतोष कुलकर्णी यांनी केले होते.
कार्यक्रमावेळी गुरुकुल पूरक उपक्रमातील विद्यार्थी श्रेया गुरव,दिव्येश कदम,जान्हवी कातकर यांनी जीवनातील गुरु चे महत्त्व विशद केले.गुरुकुल पूरक उपक्रमातील विद्यार्थ्यांनी प्रार्थना व गुरुविषयी आदरभाव व्यक्त करणारे गीत सादर केले.या विद्यार्थ्याना संतोष कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर संस्था उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर,सचिव दीपक पोंक्षे,सहसचिव दीपक शिगवण,सुभाष सहस्त्रबुद्धे, मुख्याध्यापक सौ रुही पाटणकर,व अन्य शिक्षक,पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कुलकर्णी यांनी केले.












