पाणीप्रश्न गंभीर ; प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे; निष्काळजीपणा नको: आमदार निलेश राणे
स्वप्निल कदम (कुडाळ):
महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ तालुक्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी यावर्षी तब्बल ३ कोटी ७७ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्यामध्ये तालुक्यातील १८० वाडी-वस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. जनतेच्या पाणीप्रश्नाकडे गांभीर्याने पाहून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा कडक सूचना आमदार निलेश राणे यांनी दिल्या आहेत. कुडाळ येथील पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. या बैठकीला कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी प्रवीण हेर्लेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सीताराम तेली यांच्यासह विविध जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
‘माणुसकी हाच सर्वप्रथम धर्म’ या भावनेतून अधिकारी-कर्मचारी वर्गाने जनतेच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन आमदार राणे यांनी केले. स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच व कार्यकर्त्यांना आपल्या भागातील पाणीटंचाईची प्रत्यक्ष परिस्थिती माहिती असते, त्यामुळे जनतेच्या गरजा लक्षात घेऊन अधिकारी वर्गाने सर्वांना विश्वासात घेत कामाचे नियोजन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. अधिकारी वर्गाचा आपण आदर करतो; मात्र कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही आणि पुढील बैठकीला अधिकाऱ्यांनी पूर्ण तयारीनिशी उपस्थित राहिले पाहिजे, असा इशारा त्यांनी दिला. पाणीटंचाईच्या गंभीर परिस्थितीत आवश्यक त्या ठिकाणी तातडीने टँकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही सुरू करावी आणि पाणी हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीत जलसंधारण विभागाच्या मंद गतीच्या कामकाजावर आमदार राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. चार महिन्यांपूर्वी बैठक होऊनही कामात अपेक्षित प्रगती न झाल्याने “मागील चार महिन्यांत अधिकाऱ्यांनी काय केले?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे यांनी आपल्या गावासह मतदारसंघात राबविलेल्या उपक्रमांचे आमदार राणे यांनी कौतुक केले. आढावा बैठकीत जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर यांनी दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता ग्रामीण भागातील विहिरी व इतर पाणीपुरवठा कामांसाठी बक्षीसपत्राची अट शिथिल करून संमतीपत्राच्या आधारे कामांना मंजुरी देण्याची मागणी केली. यावर प्रशासनाने गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक त्या अटी-शर्ती शिथिल करून कामांना गती द्यावी, अशा सूचना आमदार राणे यांनी दिल्या.
तसेच जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते यांनी कळसुली धरणातून आंब्रड येथे पाणी नेण्याच्या कामात सुमारे १०० मीटर अंतरावर जमीनमालकाच्या विरोधामुळे अडथळा निर्माण झाल्याचा मुद्दा मांडला. हा प्रश्न लोकहिताचा असल्याने प्रशासनाने शासकीय नियमांचा आधार घेत आवश्यक आदेश देऊन मार्ग मोकळा करावा आणि कळसुली-आंब्रड पाणीप्रश्न पुढील आठ दिवसांत मार्गी लावावा, असे स्पष्ट निर्देश आमदार राणे यांनी दिले. याचवेळी जांभवडेचे सरपंच अमित मडव यांनी विहिरींचा गाळ काढल्यामुळे चार विहिरींना धोका निर्माण झाल्याचे सांगत प्रशासनाकडून दुरुस्तीची कामे मंजूर होत नसल्याची समस्या मांडली. यावर दुष्काळात नियम शिथिल करून विहिरींच्या दुरुस्तीची कामे करून देण्याचे आदेश आमदार राणे यांनी दिले.
या बैठकीत घावनाळे येथील दिनेश वारंग, पिंगुळी येथील अजय आकेरकर, सरंबळचे रावजी कदम, वालावलचे राजा प्रभू, बांबुळीचे सरपंच प्रशांत परब, जांभवडेचे सरपंच अमित मढव आदींनी आपापल्या भागातील पाणीटंचाईच्या तीव्र समस्या मांडल्या. आमदार निलेश राणे यांनी सर्वांच्या अडचणी सविस्तर जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना त्या सर्व समस्या तातडीने निकाली काढण्याचे कडक निर्देश दिले.












