नागरी समस्येबाबत विचारला जाब
रत्नागिरी :
रत्नागिरी शहरातील मोकाट जनावरे, अस्वच्छ गटारे, खराब रस्ते यासह अनेक नागरी समस्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांनी नगरपालिकेत मुख्याधिकारी यांची भेट घेऊन जाब विचारला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, महेंद्र मयेकर, शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते. या शिष्टमंडळात माजी नगरसेवक राजेश तोडणकर, समीर तिवरेकर, मुन्ना चवंडे, श्रीमती रायकर, श्रीमती करमरकर, श्रीमती रसाळ, माजी शहराध्यक्ष राजन फाळके, मंदार मयेकर, मंदार खंडकर, निलेश आखाडे, शैलू बेर्डे, अण्णा करमरकर यांचा समावेश होता.
सध्या रत्नागिरी शहारातील रस्त्यांची दुरवस्था, अनियमित पाणीपुरवठा, गटार लाईनची खराब स्थिती आरोग्य व्यवस्था, तसेच शहरात वाढलेली भटक्या कुत्र्यांची समस्या या सर्व बाबींचा नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
विशेषतः साळवी स्टॉप येथील डंपिग ग्राऊंडवर अस्वच्छतेमुळे व दुर्गंधीमुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या ठिकाणी नियमित साफसफाई, कचरा व्यवस्थापन व निर्जंतुकीकरणाची तातडीने व्यवस्था व्हावी, अशी मागणी आहे.
त्याशिवाय शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची डागडुजी व डांबरीकरण तातडीने करावी, पाणीपुरवठा नियमित व शेड्युलनुसार सुरळीत करावा, गटार लाईनची स्वच्छता व देखभाल नियमित करावी, शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षमपणे राबवावी अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
सदर रत्नागिरी शहरातील परिस्थिती पाहता रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रशासकीय कामाबद्दल नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे निदर्शनास येते आहे. तसेच शहरातील नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे काम होत नसल्याचे दिसून येत असून येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीमधून त्यांचा वाईट परिणाम होणार आहे असेही मुख्याधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून देण्यात आले.













