सावंतवाडी । प्रतिनिधी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सावंतवाडी शाखेच्या वतीने काल, ११ जुलै रोजी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या प्रांगणात इयत्ता १०वी आणि १२वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी दोडामार्गमधील आ. दीपकभाई केसरकर महाविद्यालयाचे प्रा. सुदीप नाईक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासह अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, रत्नागिरी विभागाचे संगठन मंत्री ओजस जयवंत, श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ठाकूर सर, सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक विनीजी परब, जिज्ञासा कोकण प्रांत संयोजक स्नेहा धोते, आणि सावंतवाडी शहर प्रमुख ज्ञानेश्वर गवळी हे मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या गौरव सोहळ्याला एकूण १४० विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासोबतच, त्यांना भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा देणारे विचार मान्यवरांनी मांडले. ABVP नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असून, अशा उपक्रमांद्वारे त्यांच्या आत्मविश्वासात वाढ करत आहे, असे प्रतिपादन आयोजकांनी यावेळी केले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.












