वनविभागाकडून उत्तरीय तपासणीनंतर विल्हेवाट
राजापूर (वार्ताहर): तालुक्यील प्रिंदावन मानवाडी सड्यावरती वन्यप्राणी रानगवा मृतावस्थेत आढळून आला आहे. पशुधन अधिकाऱ्यांनी केलेल्या उत्तरीय तपासणीनंतर गव्याचा नैसर्गिक मृत्यु झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असून वनविभागाकडून मृत गव्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. तशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.
प्रिंदावन गावाचे ग्रामस्थ डॉ. घाटे यांनी वनपाल राजापूर यांना भ्रमणध्वनी वरून गवा मृतावस्थेत असल्याचे कळविले. ही माहिती मिळताच वनपाल राजापूर यांनी वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता प्रिंदावन येथील मानवाडी साड्यावर वन्यप्राणी रानगवा मृत अवस्थेत असल्याचे दिसले.
या रानगव्याची पाहणी केली असता, तो नर जातीचा असून त्याचे वय साधारण ११ ते १२ वर्ष आहे. या रानगव्याची शिकार किंवा विषबाधा झाली आहे काय याची खात्री पशुधन विकास अधिकारी राजापुर व वन अधिकारी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन खात्री केली. पशुधन विकास अधिकारी श्री.चोपडे यांचे मार्फत शवविच्छेदन केले. त्यांनी रानगव्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीम. गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण श्रीम.प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली रानगव्यास लाकडाची चिता रचून त्याला जाळून नष्ट करण्यात आल्याची माहिती राजापूर वनपाल जयराम बावदाणे यांनी दिली.
या कामी रत्नागिरी वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, वनपाल राजापूर जयराम बावदाणे, वनरक्षक राजापूर विक्रम कुंभार व रेस्क्यू टीमचे नितेश गुरव, सत्यवान तळवडेकर, रमेश बिर्जे तसेच अक्षय गुरव, पांडुरंग गोंडाळ, प्रशांत राऊत उपस्थित होते. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने श्रीमती गिरिजा देसाई विभागीय वन अधिकारी रत्नागिरी यांनी केली आहे.












