रणसंग्राम’ दिनी पर्यावरण मंडळाने अनुभवली पावनखिंड

पराक्रमी लढवय्ये आणि निसर्गास अभिवादन

चिपळूण : शिवकाळात १२ आणि १३ जुलै १६६० रोजी पन्हाळगड ते विशाळगड मार्गावर, स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो बांदल आणि मराठा सैनिकांनी पावनखिंडीत (गजापूरची घोडखिंड) शत्रूच्या हजारो सैनिकांना कडवी झुंज दिली. यात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. या देदीप्यमान इतिहासाच्या रणसंग्राम दिनाचे स्मरण आणि सह्याद्रीतील निसर्गाला आणि स्मृतीस्थळाला वंदन करण्यासाठी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने एक दिवसीय, पराक्रमी लढवय्ये आणि निसर्ग अभिवादन सहल नुकतीच संपन्न झाली.

या सहलीचे आयोजन मंडळाचे वरिष्ठ कार्याध्यक्ष विलास महाडिक यांनी केले होते. पर्यटन अभ्यासक-लेखक धीरज वाटेकर यांनी यावेळी उपस्थितांना परिसराची माहिती दिली. सध्याची ‘पावनखिंड’ जागा ही एक नैसर्गिक घळ कासारी नदीचे उगमस्थान आहे. पावसाळ्यात प्रचंड वेगाने पडणाऱ्या पाण्याची अनुभूतीही सर्वांनी घेतली. पावनखिंडीतील लढाई १२-१३ जुलै १६६० (आषाढ पोर्णिमा-प्रतिपदा) पावनखिंडीत झाली होती. समोर आदिलशहाची १० हजारांची फौज होती. महाराजांसोबत फक्त ३०० ते ६०० मावळे होते. पावनखिंडीत मसूदचे सैनिक पोहोचल्यावर त्यांना मावळ्यांचा सामना करावा लागला होता. बाजीप्रभू, फुलाजी, शंभूजी जाधव, बांदल सेना आदीं मावळ्यांच्या अभूतपूर्व पराक्रमाने गजापूरची घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड पडले. परिसरात असलेल्या भव्य बुरुजावरून उपस्थित पर्यावरणप्रेमींनी परिसराचे दर्शन घेतले. नंतर बुरुजाजावळून खाली पन्नासएक पायऱ्या उतरून एका छोटय़ाशा ओढय़ावर असलेला पूल ओलांडला. तो पूल ओलांडताच ढाल-तलवार अन् भगवा झेंडा फडकत असलेल्या स्मृतिस्थळाने उपस्थितांना दर्शन दिलं. नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पावनखिंडीत बाजीप्रभू, फुलाजी प्रभू, रायाजी बांदल आदींच्या स्मृतिस्थळासमोर पर्यावरणप्रेमींनी नतमस्तक होऊन अभिवादन केले. विविध संस्थांच्या माध्यमातून हजारो शिवभक्त इतिहासप्रेमींनी पावनखिंडीत केलेल्या ‘हरहर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणांची अनुभूती घेतली. पावनखिंडीत सुरु असलेले प्रबोधन मार्गदर्शन उपक्रम, आदरांजली, शाहिरी पोवाडे, आदी उपक्रमांमध्येही पर्यावरण प्रेमींनी आपला सहभाग नोंदवला. स्थानिक गाईड बापू बावकर यांचेकडूनही पर्यावरणप्रेमींनी इतिहास समजावून घेतला.

पावनखिंड अनुभूती घेणाऱ्यात पर्यावरण मंडळाच्या विलास महाडिक, धीरज वाटेकर, विद्याधर अजगोलकर यांच्यासह सखी मंचच्या पदाधिकारी मायावती शिपटे, विनया देवरुखकर, सदस्या स्नेहल विचारे, नसरीन खडस, अनघा परचुरे, श्वेता चव्हाण, त्रिशला तलवारे, स्मिता वीरकर, वैशाली जाधव, अलका जोशी, वृषाली शिरगावकर, तेजस्वी मोहिते, नूतन महाडीक, जिज्ञा महाडीक यांनी सहभाग घेतला. सहलीतील उपस्थितांनी, पावनखिंडीतील इतिहासाच्या पाऊलखुणांचे आणि सह्याद्रीतील वाघझरा, कोकणकडा आदी भागातील ज्या निसर्गाने हा इतिहास घडण्यात आपले योगदान दिले त्याचे दर्शन घेतले. या टीमने साडवली-देवरुख येथील सड्यांवर फुललेल्या प्रदेशानिष्ठ ‘दिपकाडी कोकणेन्स’ या दुर्मिळ वनस्पतीचीही पाहणी केली.