सावंतवाडी | प्रतिनिधी :मुक्ताई ॲकेडमीने सावंतवाडी येथील पंचम खेमराज कॉलेज हॉलमध्ये विद्यार्थ्यांसाठी कॅरम आणि बुद्धीबळ कोचिंग कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत आणि दै.कोकणसादचे पत्रकार विनायक गावस, गोवा येथील जीएसटी कस्टम सुपरीटेंडंट मधुसुदन मर्तल यांच्या शुभहस्ते आणि मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष, कॅरम प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर व बुद्धीबळ प्रशिक्षक बाळकृष्ण पेडणेकर यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली येथील बेचाळीस मुला-मुलींनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.
मधुसुदन मर्तल यांनी मनाच्या एकाग्रतेसाठी मुलांनी लहान वयात कॅरम व बुद्धीबळ खेळणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी गायन, नृत्य, अभिनय या कलाप्रकारांकडे मुलांनी वळावे, असे आवाहन केले. विनायक गावस यांनी मुलांसाठी सेमिनार, कार्यशाळा आणि स्पर्धा यांचे दरवेळी आयोजन करून मुलांमध्ये आवड निर्माण करणाऱ्या मुक्ताई ॲकेडमीचे कौतुक केले. पूर्वी खेळ व इतर उपक्रमांचे मार्गदर्शन सहज मिळत नव्हते. आज मुक्ताई ॲकेडमीच्या माध्यमातून या प्रशिक्षणाचा फायदा मुलांना होत आहे, हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
बुद्धीबळ खेळातील माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद आणि विद्यमान विश्वविजेता डी. गुकेश यांच्यासोबत खेळलेल्या बाळकृष्ण पेडणेकर यांनी मुलांना बुद्धीबळचे प्रशिक्षण दिले. जिल्ह्यातील ज्येष्ठ कॅरम खेळाडू, प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांनी मुलांना कॅरमचे प्रशिक्षण दिले. यावेळी ॲकेडमीची तेरा वर्षीय राष्ट्रीय कॅरम खेळाडू साक्षी रामदुरकर हिचा सत्कार करण्यात आला. कौस्तुभ पेडणेकर यांनी पुढील महिन्यात कॅरम व बुद्धीबळ स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. कार्यशाळेत सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रे देण्यात आली. ॲकेडमीची राष्ट्रीय बुद्धीबळ खेळाडू गार्गी सावंत हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.












