मालवण | प्रतिनिधी: गंभीर आजार झाला असावा या भीतीने नितीन मुकुंद कोचरेकर (वय – ४३) रा. कोळंब खालचीवाडी या तरुणाने राहत्या घरात नायलॉन दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे.
कोळंब खालचीवाडी येथील नितीन कोचरेकर याच्या तोंडात फोड आले होते. त्यामुळे त्याला आपल्याला कर्करोग झाला असावी अशी भीती निर्माण झाली. या भीतीनेच त्याने राहत्या घरी पडवीत नायलॉनच्या दोरीने वाशाला गळफास लावून घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मारुती जगताप, सुशांत पवार यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेत पंचनामा केला. पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी सुशांत पवार अधिक तपास करत आहेत.













