सावंतवाडी : सावंतवाडी शहरात ९ जुलै रोजी धुमाकूळ घालून घरफोडीचा प्रयत्न, मोबाईल चोरी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यांना पकडल्यानंतर आता त्यांनी चोरी केलेला मुद्देमाल ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना यश आले असून, चोरलेल्या दोन्ही दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
या चोरी प्रकरणातील पहिली दुचाकी कणकवली सावडाव येथून हस्तगत केल्यानंतर आता दुसरी दुचाकी कोल्हापूर जिल्ह्यातून अस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, चोरलेले मोबाईल आणि चोरटे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
याबाबत अधिक माहिती अशी की, ९ जुलैच्या रात्री गोवा-कळंगुट येथील एका टॅक्सीचालकावर प्राणघातक हल्ला करून त्याची टॅक्सी घेऊन हे चोरटे सावंतवाडीत आले होते. सावंतवाडीत त्यांनी खासकिलवाडा परिसरातील हेल्थ पार्कमधून मिनल भिरमुळे यांची दुचाकी आणि तेथे झोपलेल्या दोन कामगारांचे मोबाईल चोरले. तसेच, ज्यूस्तीनगर येथील पॉवलीन रॉड्रिग्स यांचीही दुचाकी त्यांनी पळवली. याशिवाय, जेलनजीकच्या एका बंगल्यात घरफोडीचा प्रयत्नही चोरट्यांनी केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात घरफोडी, मोटरसायकल चोरी आणि मोबाईल चोरी असे तीन स्वतंत्र गुन्हे अज्ञात व्यक्तींविरोधात दाखल करण्यात आले होते.
पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. शहरातील मोक्याच्या ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, काही फुटेजमध्ये संशयित निदर्शनास आले होते. तपास पथके जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरही शोध घेत होती. चोरलेल्यांपैकी एक दुचाकी कणकवली तालुक्यातील सावडाव येथे आढळून आली होती. त्यानंतर, दुसरी दुचाकीही पोलिसांनी सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातून हस्तगत केली. त्यामुळे सावंतवाडी तालुक्यातून चोरीस गेलेल्या दोन्ही दुचाकी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत.
दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असले तरी, चोरलेले दोन मोबाईल अजूनही पोलिसांना मिळालेले नाहीत. पोलीस अधिक तपास करत असून मोबाईल देखील हस्तगत केले जातील, अशी माहिती सावंतवाडी पोलिसांनी दिली आहे.











