रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर बावनदी येथे भरधाव शेवर्लेट एन्जॉय कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तेजस विनायक पांचाळ (२४, रा. वेळवंड, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या भीषण अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
तेजस हा बावनदी येथील पुलावरून वळण घेत असताना मुंबईहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या शेवर्लेट एन्जॉय कारने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की, तेजस दुचाकीवरून उडून रस्त्यालगत असलेल्या दगडावर आदळला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या मदतीने गंभीर जखमी तेजसला उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले. मात्र, डोक्याला झालेली गंभीर दुखापत जीवघेणी ठरली. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
या अपघातामुळे वेळवंड परिसरावर शोककळा पसरली असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर वाढलेल्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित प्रवासाचा मुद्दा पुन्हा अधोरेखित झाला आहे. महामार्गावरील धोकादायक वळणे, भरधाव वाहने आणि वाढती वाहतूक यामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याने वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.













