केंद्र शासनाकडुन प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात दि.11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यासाठी दि. 11 जुलै 2025 ते 18 जुलै 2025 या कालावधी दरम्यान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करून “जागतिक लोकसंख्या दिन सप्ताह ’’साजरा करण्यात येत आहे.
“जागतिक लोकसंख्या दिन” 2025 करिता शीर्षक (थीम) “नियोजित पालकत्वासाठी आरोग्यदायी वेळ आणि गर्भधारणेमधील अंतर” असे असून तसेच यावर्षाचे घोषवाक्य: “आई होण्यासाठी योग्य वय तेव्हा, शरीर व मनाची तयारी जेव्हा”असे आहे.
या दिवसाचे औचित्य साधून दि. 11 जुलै 2025 ते 18 जुलै 2025 या कालावधीत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात ‘लोकसंख्या सप्ताह’ निमित्ताने आरोग्य विभागामार्फत विविध उपक्रमांच्या माध्यमातून शासकीय रुग्णालयांमध्ये कुटुंब नियोजन नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन, कुटुंब नियोजन विषयक जनजागृती रॅली, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांवर कुटुंब नियोजन साधनांचे मोफत वितरण तसेच शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती व्याख्याने, आशा व आरोग्यसेवक-सेविकांमार्फत घरोघरी कुटुंब नियोजन माहिती, वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत मुलांमध्ये लैंगिक शिक्षण व सुरक्षित आरोग्य यावरील मार्गदर्शन सत्रे,विविध समाजमाध्यमाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.
या अभियानाचा उद्देश जनतेमध्ये लोकसंख्या नियंत्रण, कुटुंब नियोजन, महिलांचे आरोग्य व हक्क याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे.संपूर्ण सप्ताहात जिल्ह्यातील आरोग्य विभाग, जिल्हा परिषदेअंतर्गत विविध यंत्रणा, स्थानिक प्रशासन यांचे सहकार्य लाभत आहे.
वाढती लोकसंख्या ही केवळ आकड्यांची समस्या नाही, तर ही मानवतेच्या गुणवत्तेची परीक्षाही आहे. आरोग्य सेवा, शिक्षण, व जागरूकता हे तीन मुख्य स्तंभ या समस्येच्या उपाययोजनेसाठी महत्त्वाचे आहेत. शासन, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक यांनी एकत्र येऊन जबाबदारीने कृती केली, तर आपण या आव्हानावर नक्कीच मात करू शकतो असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.
(डॉ.अनिरुद्ध आठल्ये),
जिल्हा आरोग्य अधिकारी,
जिल्हा परिषद रत्नागिरी











