जालगाव (दापोली) येथे हिंदूराज मित्र मंडळातर्फे शिवजयंती उत्सवाचे आयोजन

दापोली| प्रतिनिधी :सालाबादप्रमाणे यावर्षीही जालगाव (ता. दापोली) येथील हिंदूराज मित्र मंडळ यांच्या वतीने शिवजयंती उत्सव २०२६ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. फाल्गुन कृ. तृतीया, शुक्रवार दिनांक ६ मार्च २०२६ (तिथीनुसार) हा उत्सव आयोजित करण्यात आला असून यंदा या उत्सवाचे १५ वे वर्ष आहे. मंडळाच्या सभासदांनी घेतलेल्या मेहनतीमुळे यावर्षीचा उत्सव अधिक भव्य आणि सुयोग्य पद्धतीने पार पडणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहून नागरिकांनी उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता किल्ले रायगड ते शिवस्मारक दापोली मशाल ज्योत आगमन होणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण होणार असून हे अनावरण प्रति शिवाजी शिवा काशीद यांचे थेट १३ वे वंशज श्री. आनंदराव रघुनाथराव काशीद तसेच मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता शिवस्मारक दापोली ते श्रीराम बलवर्धक पटांगण, जालगाव दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच रात्री ९ वाजता सुरचित्ता मल्लखांब ग्रुप दापोली आणि राष्ट्रवीर संघ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने मल्लखांब व शिवकालीन युद्धकला प्रत्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत.
सदर कार्यक्रमाचे ठिकाण श्रीराम बलवर्धक पटांगण, फाटक दुकान शेजारी, जालगाव (ता. दापोली) असे असून या शिवजयंती उत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन हिंदूराज मित्र मंडळातर्फे करण्यात आले आहे.