खेड । प्रतिनिधी
दापोली शहरात सध्या वारंवार वीज खंडित होणे, घरांवरून लोंबकळणाऱ्या धोकादायक विद्युत तारांचे अस्तित्व, जुने व सडलेले विजेचे खांब, तसेच रस्त्याच्या मधोमध आडसर ठरणाऱ्या विद्युत तारा अशा विविध समस्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. याप्रश्नी नगराध्यक्ष सौ. कृपाताई घाग यांनी थेट पुढाकार घेत, खेड येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रमोद बाबरेकर यांची भेट घेऊन या समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली.
या भेटीस माजी नगराध्यक्ष राजेंद्र पेठकर आणि माजी नगरसेवक प्रकाश साळवी हे देखील उपस्थित होते. यापूर्वीही दापोली उपकार्यकारी अभियंता (दापोली-1) यांना लेखी निवेदन देत या समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, अनेक दिवस उलटून गेले तरीही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नव्हती. त्यामुळेच थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा निर्णय नगराध्यक्ष घाग यांनी घेतला.
कार्यकारी अभियंता बाबरेकर यांना दिलेल्या लेखी निवेदनात दापोलीतील विविध भागांतील विद्युत समस्या स्पष्टपणे नमूद करण्यात आल्या. शहरात वारंवार वीज खंडित होणे ही सर्वसामान्य नागरिकांसोबतच व्यावसायिकांनाही अडचणीची बाब बनली आहे. त्याचबरोबर घरांच्या छपरांवरून धोकादायकरीत्या लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी सडलेले, वाकलेले व जुने पोल त्वरित बदलण्याची गरज आहे. तसेच, काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध लटकणाऱ्या तारांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत कार्यकारी अभियंता प्रमोद बाबरेकर यांनी त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी दापोली कार्यालयाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्याचे सांगितले असून, नागरिकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून विद्युत समस्या लवकरच सोडवल्या जातील, असे यावेळी सांगितले.
दापोलीच्या नगराध्यक्षांच्या या पुढाकारामुळे नागरिकांत समाधानाचे वातावरण असून, शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि दैनंदिन जीवनातील अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली आहे.











