खेड – प्रतिनिधी
दिनांक ७ व ८ ऑक्टोबर २०२५ रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर तसेच रत्नागिरी जिल्हा योगासन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय शालेय योगासन स्पर्धा इचलकरंजी येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत रोटरी स्कूल, खेडच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत एकूण ७ रौप्य पदके व ३ कांस्य पदके मिळवत यशाची परंपरा कायम राखली.
या विभागीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यासह विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. तीव्र स्पर्धेमध्ये रोटरी स्कूलच्या योगपटूंनी उत्कृष्ट कामगिरी सादर करून शाळेचे नाव उज्ज्वल केले.
१४ वर्षे मुलांच्या गटात रिदमिक प्रकारात श्री दळवी व श्लोक दळवी यांनी रौप्य पदक पटकावले. ट्रॅडिशनल वैयक्तिक प्रकारात शाश्वत धुमाळ याने रौप्य पदक मिळवले, तर आर्टिस्टिक सांघिक प्रकारात शाश्वत धुमाळ व कु. स्पंदन धामणे यांनी रौप्य पदक प्राप्त केले. आर्टिस्टिक वैयक्तिक प्रकारात स्पंदन धामणे हिने कांस्य पदकाची कमाई केली.
१९ वर्षे मुलींच्या गटात आर्टिस्टिक सांघिक प्रकारात अनुष्का म्हातले व प्रांजल आंबाडे यांनी रौप्य पदक, तसेच रिदमिक प्रकारात कांस्य पदक पटकावले. या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षक डॉ. गौरव आंब्रे व सौ. शितल घाणेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
रोटरी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. श्री. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.










