मायक्रो फायनान्स कंपन्या, सावकारांवर कारवाई करा

जनता दल सेक्युलरचे तहसिलदार, गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर

चिपळूण (प्रतिनिधी) : जिल्ह्यात १० मायक्रो फायनान्स कंपन्या व शेकडो सावकार असून ते कर्जदार महिलांना त्रास देत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी जनता दल सेक्युलर यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार प्रवीण लोकरे व गटविकास अधिकारी उमा घारगे-पाटील यांच्याकडे केली आहे.
या निवेदनामध्ये म्हटले आहे की, मायक्रो फायनान्स कंपन्यांनी नियमबाह्य कर्ज वाटप करून आर्थिक साक्षरता नसलेल्या महिलांना कर्जाच्या सापळ्यात अडकवले आहे. आधीचे कर्ज फेडण्यासाठी दुसरे, तिसरे कर्ज दिले जात आहे. त्यामुळे कर्जाचे हप्ते भरताना महिलांची तारांबळ उडत आहे. कर्जाचे हप्ते आठवडा, पंधरवडा व मासिक पद्धतीने भरावे लागतात. त्याच्या वसुलीसाठी एजंट कधीही महिलांच्या घरी येत असून हातात पैसे मिळेपर्यंत ते जात नाहीत. अनेकदा मध्यरात्रीही पैशासाठी घरी येतात. महिलांना अपशब्द वापरले जात असून धक्काबुक्की केली जाते. प्रत्यक्षात व्याजदर २४ टक्के सांगितला गेला असला तरी २८ ते ३६ टक्के व्याज घेतले जात आहे. तर दुसरीकडे खासगी सावकार मायक्रो फायनान्सच्या विळख्यात अडकलेल्या महिलांचा फायदा घेत त्यांना कर्ज देत आहेत. त्याला तर मनाला वाटेल तो व्याजदर लावला जात आहे. त्यामुळे फायनान्स कंपन्या व सावकार यांनी महिलांना जगणे कठीण केले आहे. तरी त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर ८५ महिलांच्या सह्या आहेत. हे निवेदन देताना अझीझ सय्यद, शोभना सकपाळ, रुक्साना खान, नजमा सय्यद, मनाली कदम, शारदा सावंत, पूजा शिंदे आदी उपस्थित होते.