कामासाठी सुमारे सहा कोटींचा निधी मंजूर; लवकरच मिळणार कामाला गती
चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील वाहतूक कोंडीवर उत्तम पर्याय ठरणारा पेठमाप-मुरादपूर पुलाचे काम रेलिंगसह सज्ज आहे. मात्र जोडरस्त्याची कामे रखडल्याने या पुलावरची वाहतूक सुरू होऊ शकलेली नाही. मात्र आता शहरवासियांसाठी उपयुक्त ठरणारा हा प्रकल्प लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. सुमारे सहा कोटींचा निधी मंजूर असलेल्या या जोडरस्त्यांच्या कामासाठी नगर पालिका प्रशासनाने गुरुवारी निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात या कामाला गती मिळणार आहे.
चिपळूण शहरातील पेठमाप आणि मुरादपूर ही दोन मोठी लोकवस्ती असणारे भाग वाशिष्ठी नदीमुळे विभागलेली आहेत. इंग्रजांच्या काळात येथे फरशी बांधण्यात आली होती. ओहटीच्यावेळी या फरशीवरून वाहतूक केली जात होती. आता देखिल काही प्रमाणात ती फरशी अस्तित्वात असून त्यावरून हलकी वाहने ये-जा करतात. परंतु भरतीच्यावेळी तसेच पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहामुळे येथील वाहतूक तसेच येण्या-जाण्याचा मार्ग देखिल बंद पडतो. साहजिक परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे येथे पूल व्हावा अशी मागणी नागरिक कित्येक वर्षाची आहे. या मागणीची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी मुरादपूर-पेठमाप असा पूल शासनाकडून मंजूर करून घेतला. त्यासाठी सुमारे १२ कोटी रुपये शासनाने मंजूर केले, तसेच या पुलाच्या जोड रस्त्यासाठी ६ कोटीचा निधीही मंजूर केला आहे.
गेल्या काही वर्षांपासून या पुलाचे काम सुरु आहे. पावसाळ्यापूर्वी १६ पिलरचे काम पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर तातडीने पुलाचे गर्डर चढविण्याचे काम सुरु केले. एकीकडे हे काम सुरु असतानाच दुसऱ्या बाजूनी स्लॅब टाकण्याचे काम सुरु केले. बघता बघता या पुलावर स्लॅबचे काम पूर्ण होताच पुलावरील रेलिंगचे कामही पूर्ण झाले आहे. मात्र आता पुलाच्या जोड रस्त्याचाच प्रश्न निर्माण झाला आहे. मुळात या कामावर आमदार शेखर निकम यांनी विशेष लक्ष केंद्रित केले असून या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. त्यानुसार जोड रस्त्याची निविदा गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. येत्या पंधरा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करून तातडीने जोड रस्त्याचे काम हाती घेतले जाणार असल्याचे नगर अभियंता दीपक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.












