कलंबिस्त हायस्कूलच्या पालकसभेत ‘सजग पालकत्व’ विषयावर व्याख्यान 
सावंतवाडी । प्रतिनिधी : आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात मुलांना यशस्वी होण्यासाठी आधुनिक पद्धतीने शिक्षण घेणे आणि पालकांनी त्यांच्या भवितव्याबाबत सजग राहणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त हायस्कूलमध्ये आयोजित पालक-शिक्षक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यक्त केले. ‘सजग पालकत्व’ या विषयावर ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कलंबिस्त प्रशालेत नुकत्याच झालेल्या पालक-शिक्षक सभेत प्रा. पाटील यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरची दिशा निश्चित करून त्या दृष्टीने सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे. तसेच, मोबाईल आणि टीव्हीचा वापर मर्यादित व गरजेपुरता करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
प्रा. पाटील यांनी पालकांना आवाहन केले की, मुलांना घडवताना त्यांनी अत्यंत सजगपणे आणि जबाबदारीने वागले पाहिजे. मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि संस्कार यांबाबत पालकांनी दक्ष राहून स्वतः लक्ष देणे गरजेचे आहे. नवीन शैक्षणिक धोरणातील बदलांची जाणीव करून देत, प्रा. पाटील यांनी आपल्या मिश्किल आणि खुमासदार शैलीत पालकांना ‘आपल्या जगण्याचे स्टँडर्ड वाढवा’ आणि ‘वास्तवाचे भान राखा’ असे आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर पालक-शिक्षक संघ कार्यकारिणीचे सदस्य सत्यविजय राऊळ, महादेव मेस्त्री, सुचिता वर्दम, हेमलता मेस्त्री, संजना बिडये, अश्विनी गोसावी, मलप्रभा गुरव, सुभाष राऊळ यांच्यासह प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव, ज्येष्ठ शिक्षक शरद सावंत आणि सत्यार्थ महाराष्ट्र न्यूज चॅनलचे व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परब आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांच्या स्वागतपर भाषणाने आणि सभेच्या प्रास्ताविकाने झाली. यावेळी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी पालक-शिक्षक संघाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा आणि शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. प्रशालेला विविध स्वरूपात लाभलेल्या देणगीदारांचा आढावा शिक्षिका विनिता कविटकर यांनी सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक किशोर वालावलकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन विलास चव्हाण यांनी केले.












