​हृदयद्रावक! सातार्डा-रायाचेपेड येथे मायलेकाची तेरेखोल नदीत उडी टाकत आत्महत्या

एकमेकांचे हात बांधून संपवले जीवन

​बांदा : प्रतिनिधी

सातार्डा-रायाचेपेड परिसरात एक अत्यंत हृदय हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास एका मातेने आणि तिच्या तरुण मुलाने परस्पर आपले हात रस्सीने बांधून तेरेखोल नदीपात्रात उडी टाकली. या दुर्दैवी घटनेत मायलेकाचा अंत झाला असून, या आत्महत्येमुळे आरोंदेकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ​रविवारी सकाळी तेरेखोल नदी किनारपट्टीलगत चप्पल सापडल्याने संशयाची पाल चुकचुकली. त्यानंतर मायलेकाने नदीत उडी मारल्याची कुणकुण लागताच सावंतवाडी पोलीस आणि गोवा पोलिसांची यंत्रणा तातडीने कामाला लागली. गोवा पोलिसांकडून बोटीच्या साहाय्याने नदीपात्रात शोधमोहीम राबवण्यात आली.

​दरम्यान, ग्रामस्थ शरद राऊळ यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मृतदेह शोधणे शक्य झाले. त्यांनी दोरीच्या साहाय्याने दगडाने नदीत गळ टाकला. ज्या ठिकाणी मायलेकाने उडी मारली होती, त्याच ठिकाणी दोन्ही मृतदेह एकमेकांचे हात रस्सीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढून पुढील शवविच्छेदनासाठी सावंतवाडी येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. श्रुतिका श्यामसुंदर आरोंदेकर (वय ५५) व तिचा
​मुलगा तुकाराम (सुहास) श्यामसुंदर आरोंदेकर (वय २६) अशी मयतांची नावे आहेत.

​घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी प्रशासकीय यंत्रणा आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी धाव घेतली. यामध्ये पोलीस पाटील विनिता मयेकर, सातोसे पोलीस पाटील संदीप सातार्डेकर, सावंतवाडी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सातार्डा बिट अंमलदार श्री. टाकेकर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये आणि सरपंच संदीप प्रभू यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ग्रामस्थांनीही शोधकार्यात आणि मदतकार्यात मोलाचे सहकार्य केले.

​पहाटेच्या सुमारास मायलेकाने एवढे टोकाचे पाऊल का उचलले? त्यांच्या या दुर्दैवी निर्णया मागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस अधिक तपास करत असून, या दुर्दैवी घटनेमागील गूढ उकलण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.