सावंतवाडीत भाजप युवा मोर्चातर्फे भव्य बॉडी बिल्डिंग व नरकासुर स्पर्धा

आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर निवेद शेटकर ठरणार विशेष आकर्षण

सावंतवाडी । प्रतिनिधी :
​सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने दीपावली औचित্য साधून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून भव्य बॉडी बिल्डिंग स्पर्धा आणि नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याविषयीची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी ही घोषणा केली. या पत्रकार परिषदेस भाजप युवा नेते विशाल परब, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, आंबोली मंडळ अध्यक्ष विनेश तावडे, दिलीप भालेकर यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ संकल्पनेनुसार आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशात फिटनेस संदर्भात विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर युवकांना व्यायामाकडे आकर्षित करण्यासाठी आणि ‘नशामुक्त भारत’ या ध्येयाला बळ देण्यासाठी ‘विशालश्री’ या नावाने भव्य बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन युवा मोर्चातर्फे करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ठीक ६ वाजता जगन्नाथराव भोसले उद्यान येथे होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र भाजप युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी नगरपरिषद उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर व युवकांचे आधारस्तंभ विनोद राऊळ उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती उपसभापती गौरव मुळीक यांनी दिली. या बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे सर्वात मोठे विशेष आकर्षण मुळचे गोवा येथील आणि सध्या दुबईत वास्तव्य असलेले आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर विजेते निवेद शेटकर हे असणार आहेत.

​भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली नशा मुक्तीसाठी सातत्याने पुढाकार घेतला जात असून, युवकांनी व्यसनांपासून दूर राहून शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. याचबरोबर, दीपावलीच्या पूर्वसंध्येला दि. ७ नोव्हेंबर रोजी शिवरामराजे भोसले पुतळ्याजवळ, मोती तलाव, अमूल आईस्क्रीमच्या समोर कॉर्नरवर भव्य नरकासुर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती विनेश तावडे यांनी दिली. या नरкаसुर स्पर्धेनिमित्त विशेष ‘रील स्पर्धा’ (Reel Competition) चे देखील आयोजन करण्यात आले असून, ती खुला गट व बालगट अशा दोन स्वतंत्र गटांत पार पडणार आहे. आयोजित करण्यात आलेल्या या दोन्ही स्पर्धांचा सावंतवाडीकरांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा आणि कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.