निवळीवासीयांचा आरोप
रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील निवळी-शिंदेवाडी येथील परिसरात साफसफाई करत असाताना दोन दिवसांपूर्वी तुटून पडलेल्या वीजेच्या प्रवाहित तारेला चिकटून दोघांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार 17 जुलै रोजी सायंकाळी 5 वा.सुमारास उघडकीस आली. या दुर्घटनेने सार्या गावावर शोककळा पसरली आहे.
चंद्रकांत यशवंत तांबे (40) आणि मृदुला वासुदेव वाडकर (60,दोन्ही रा.निवळी,रत्नागिरी) अशी प्रवाहित विद्युत तारेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. दरम्यान महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच हे दोन बळी गेले असल्याचा आरोप गावकर्यांनी केला असून महावितरणच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचार्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवळी ग्रामपंचायतीचे सदस्य संजय निवळकर यांनी केली आहे. या दुर्घटनेनंतर गावकरी प्रचंड संतापले होते. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव आपल्या टिमसह घटनास्थळी पोहचले होते.
यातील वाडकर कुटुंबियांच्या घराशेजारील महावितरणची प्रवाहित तार दोन दिवसांपूर्वी तुटून पडलेली होती. याबाबत त्यांनी महावितरणकडे तक्रार दिली होती. परंतू त्यांच्या तक्रारीची महावितरणने दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे तुटलेल्या तारेचा विद्युत प्रवाह सुरुच राहिला. दरम्यान गुरुवारी दुपारी चंद्रकांत यशवंत तांबे आणि मृदुला वासुदेव वाडकर त्याच ठिकाणी झाडे-झुडपे तोडून साफसफाई करत असातना त्यांना या विद्युत तारेचा स्पर्श होउन त्यांना आपला प्राण गमवावा लागला. सायंकाळी 5 वा.सुमारास गावातील एक महिला त्याठिकाणाहून जात असताना तिला ही दोघही विद्युत तारेला चिकटून पडलेली दिसून आली. त्यांना विजेचा धक्का लागल्याचे लक्षात येताच त्या महिलेने आरडा-ओरडा केल्यानंतर आजुबाजुचे गावकरी घटनास्थळी धावून आले. समोरील दृश्य पाहून त्यांनाही धक्का बसला होता. या सर्व प्रकारामुळे निवळी येथील ग्रामस्थ संतापले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ग्रामीण पोलिसांनी अधिकची कुमक मागवून घेतली होती.
चौकट – महावितरण मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये देणार
गुरुवारी दुपारी निवळी-शिंदेवाडी येथे विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्यांचे संतप्त नातेवाईक आणि तेथील ग्रामस्थांनी शुक्रवारी दुपारी जिल्हा शासकिय रुग्णालयात धडक दिली. त्याठिकाणी गोंधळ करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. दरम्यान,या सर्व गोंधळामुळे ग्रामीण पोलिस आणि महावितरणचे अधिकारी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल झाले होते. महावितरणच्या अधिकार्यांनी मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधून भरपाई स्वरुपात प्रत्येकी 4 लाख रुपये देण्याचे कबुल केले. त्यानंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी दुपारी 12 वा.सुमारास दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. शुकवारी सायंकाळी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.











