डॉ.बाळकृष्ण लळीत —————————————- शके१६९६ म्हणजेच इ.स.१७७४ मधील नारिंग्रे येथील श्रीदेव गांगेश्वर मंदिराच्या संदर्भातील एक ‘सनद ‘उपलब्ध आहे. त्या गावचे महाजन असलेल्या बाबाजी प्रल्हाद उपनाव अभ्यंकर यांनी जो या देवालयाचा जिर्णोद्धार केला. त्यासंदर्भात ती आहे. सुरवातीला म्हटले आहे की,’ मौजे ‘नारिंगेर’, ता.साळशी, प्रांत राजापूर…’हे ‘नारिंगेर ‘म्हणजेच आजचे देवगड तालुक्यातील ‘नारिंग्रे’ गाव. गावात एकूण बारा वाड्या आहेत.भंडारवाडी, देऊळवाडी, वरचावाडा,खालचा वाडा,जोगवली आणि’गिरावळ’ या गिरावळ वाडीत पूर्वी खाडिलकर मंडळींची १०-१२ घरे होती ; पैकी आता २/३ जागती आहेत.श्रीदेव गांगेश्वर हे येथील ग्रामदैवत तर रामेश्वराचेही नित्य दर्शन ग्रामस्थ घेतात.शिवाय गावात दोन दत्त मंदिरे आहेत. ‘पूवी पासून ‘नाराळांचे आगर असलेले’ म्हणून ‘नारळ +आगरे ते ‘नारिंग्रे’अशी एक गाव नावांची व्युत्पत्ती सांगितली जाते.नारिंग्रे हे जसे ग्रामनाम आहे तसेच ते येथील नदीचेही आहे. ती आयनल कोळोशीच्या जंगलात उगम पावते व मिठबावला समुद्रास मिळते. हडपिड, साळशी,तोरसोळे,किंजवडे कामते,दहिबाव,नारिंग्रे बागमळा, हिंदळे व मिठबाव गावातून ती वाहते.आबासाहेब राणे विद्या मंदिर ही प्राथमिक शाळा,तर एस.पी.राणे माध्यमिक विद्यालय आहे. पुढील शिक्षणासाठी कुणी देवगड,मालवण तर आपल्या सोयीने जाते.मी एकदा आमचे साहित्य प्रेमी ज्येष्ठ मित्र बाळ राणे याना भेटायला या गावी गेलो होतो.साहित्यविषयक माहितीचा खजिना त्यांच्यापाशी होता. ते शीघ्रकवी होते. खूप बोलका स्वभाव..म्हणून मला ते प्रिय होते,याच गावच्या एका टोकाला असलेल्या गिरावळवाडीत नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या पूर्वजांचे घर होते. आज आपण ज्या रघुनाथ केशव ऊर्फ र.के.खाडिलकर यांच्याविषयी माहिती करून घेणार आहोत; त्याच वाडीत रघुनाथ यांचा जन्म १५ डिसेंबर १९०५ साली झाला.वडिल केशव यांना घरात आणि गावात ‘बापू’ या नावाने ओळखत.दुर्दैवाने रघुनाथ अगदी लहान असताना आईवडीलांच्या सहवासाला कायमचे मुकला.वय अवघे १२वर्षे असताना रघुनाथ मुंबईला गेले. ००० त्यांची जीवन कहाणी कृपया आपण पूर्ण वाचावी. ती वाचून आपल्या एका लालमातीत जन्मलेल्या व्यक्तीबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल. खाडिलकर कुलवृत्तांत त्यांच्याविषयी माहिती मिळते ती तशी- “गावी नारिंग्रे येथे जवळचे संभाळ करणारे कोणीच नाही तेव्हा गाव सोडण्याची वेळ रघुनाथवर आली तेव्हा ते ‘आपले ज्येष्ठ बंधू दत्तात्रय यांचेकडे शांतारामाची चाळ माझगाव(मुंबई) येथे आले व म्युनिसिपल शाळेत जाऊ लागले.दरम्यान १९१८ मध्ये श्री. विठ्ठल रामचंद्र खाडिलकर यानी त्याना पुण्यास नेऊन त्या काळच्या गरीब विद्यार्थ्यांच्या पध्दती प्रमाणे वार लावून वा मधुकरी मागून शिक्षण चालू ठेवले. धनार्जनासाठी रघुनाथरावानी मोडक कोल्हटकर कंपनीचे दार उघडून, केर काढून पाण्याचा माठ भरून ठेवण्यापासून सर्व प्रकारची कामे केली.पुढे काकासाहेब खाडिलकर यांचे ज्येष्ठ पुत्र यशवंत (अप्पासाहेब) याच्याशी ओळख झाली.त्यांच्या घरी गेले तेव्हा त्याना ताप भरलेला होता. अप्पासाहेबांच्या आईने (गौर काकू) त्याना मलेरिया झाला होता असे ओळखले. मायेचा हात आईच फिरवते असा त्यांचा अनुभव होता त्याचा पुनःप्रत्यय त्याना त्यावेळी आला,
इ.स.१९२४ साली मॅट्रिक झाले आणि पैशाची चणचण भासू लागली परंतु शिक्षण तर करायचेच या हेतूने काकासाहेबानी ‘नवाकाळ’ मध्ये मुद्रितशोधकाची नोकरी दिली.१९२८ मध्ये सायमन कमिशनच्या विरुध्द खंडाळ्याच्या घाटात घोषणा दिल्याबद्दल त्याना पकडून सकाळी सोडून देण्यात आले. १९३० मध्ये ते बी.ए.च्या परिक्षेला बसले होते.”(पृ.४३४) ००० वाचक मित्रहो..! आपल्या जिल्ह्यातील अनेकांना जुन्या काळी शिक्षणासाठी जी वणवण करावी लागली व कष्ट घेऊन स्वतःला सिध्द करावे लागले त्यापैकी एक सिंधुरत्न म्हणजेच र.के. खाडिलकर.महात्मा गांधीना येरवड्याच्या तुरुंगात ठेवले होते अशी कुणकुण लागताच तुरुंग फोडून गांधीजीना सोडवून आणावयाचे म्हणून ते निघाले तो बंड गार्डनजवळ पकडले जाऊन,वय लक्षात घेता,तीन-चार महिन्यांची शिक्षा झाली.तेव्हापासून त्याना तुरुंगाची सवय झाली.तुरुंगात रोज पाच-पाच पायली दळण दळावे लागे.त्याविरुध्द रघुनाथराव व नानासाहेब गोरे यांनी संप केला म्हणून त्याना पोत्यात घालून वरून बेदम चोपण्यात आले.अशी माहिती मिळते. १९३२ मध्ये ते काही काळ भूमिगत असताना सोलापूरच्या एका मारवाड्याच्या तळघरातील गोदामात चादरीच्या गाठीत लपून राहिले. मोकळी हवा घेण्यासाठी बाहेर आल्यावर पकडले गेले नंतर ठराविक हद्दीच्याबाहेर जायचे नाही या अटीवर पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये राहाण्याची परवानगी दिली. एल्.एल्.बी.च्या परिक्षेस बसले.परत त्याना राजकीय कारणासाठी अटक झाली. मे १९३४ मध्ये सुटले.
१९३४ मध्ये जवीनदास चौधरी यांच्या पुण्यातील शोकसभेमध्ये रघुनाथरावांचे भाषण प्रभावशाली झाले. त्याच सभेत डॉ.चपलाबाई करंदीकर यांनी भाषण केले तेथे त्यांची ओळख झाली.पुढे १९३६ मध्ये विवाहबध्द झाले.यांना चार कन्या झाल्या. ००००
“रघुनाथरावांनी चळवळीला वाहून घेतल्यामुळे नोकरी कधीच केली नाही. वर्तमान पत्रात काम केले तर देशसेवा म्हणून. त्याबद्दल पैसाही घेत नसत. इतकेंच नव्हे तर रघुनाथरावांच्या राजकारणामुळे स्नेही,भूमिगत कार्यकर्ते रात्री अपरात्री आश्रयाला येणाऱ्यांची व्यवस्था चपलाबाई करत असत.
फैजपूर काँग्रेस (१९३६) अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर त्यानी अहवाल सादर केला. पुढे एम्. एन् .रॉय यांच्या नवमतवादी विचारांचा प्रभाव पडला. भारतीय संस्कृतीत सार्वजनिक क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्तिंचे वैयक्तिक चारित्र्यही स्वच्छ,निष्कलंक असावे लागते असे मत रघुनाथरावांनी प्रतिपादन केले त्यामुळेच रॉय व रघुनाथराव यांचे पटले नाही.’
(खाडिलकर कुलवृत्तांत,४३५) पक्षाची सरचिटणीसपदाची जबाबदारी रघुनाथरावावर आली, “हिंदुस्थान आणि चीनला जर सह-अस्तित्व आहे तर हिंदुस्थान आणि पोर्तुगालचे सह-अस्तित्व पं. जवाहरलाल नेहरू का मान्य करत नाहीत.” या सालाझारच्या प्रश्नामुळे गोव्याच्ची मुक्तता सहजासहजी होणार नाही हे जाणून रघुनाथराव, जयंतराव टिळक आणि एक गृहस्थ अशा तिघांनी गोवा विमोचन समिती स्थापिली. श्री. केशवराव जेथे अध्यक्ष झाले. या प्रयत्नांच्या अखेरीस १९ डिसेंबर १९६१ रोजी सकाळी नऊ वाजता गोव्यावर भारतीय ध्वज फडकला. त्यासाठी १२ मे १९५५ पासून रघुनाथराव सतत झगडत होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी पुण्याच्या समितीत रघुनाथराव होते.” ०००० *राजकीय प्रवास-* १९५७ च्या निवडणुकीत रघुनाथराव नगर जिल्ह्यामधून निवडून आले आणि १ मे रोजी संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला.पुढे रघुनाथराव केंद्रीय मजूरमंत्री असताना त्यांनी कामगारांच्या बोनसचा प्रश्न, सहकारी मंत्र्यांची नाराजी किंवा रोष पत्करूनही सोडविला व ८.३३ टक्के बोनसचा कायदा झाला त्याचबरोबर भविष्य निर्वाह निधी कामगारांना सक्तीचा करावा ही सूचना अंगिकारिली होती तिला त्यावेळी विरोध झाला पण पुढील वर्षी त्याबाबत कायदा झाला.
रघुनाथरावांनी १९५२ मध्ये आशियाई शांतता परिषद चीन, १९५३ मधे जागतिक शेतकरी आणि वनसेवक परिषद व्हिएन्ना, १९५३ मध्ये अमेरिका व १९५५ मध्ये मध्यपूर्वेस भारताचे प्रतिनिधीत्व केले. तसेच ते १९६९-७० मध्ये अर्थखात्याचे राज्यमंत्री,१९७० मध्ये पुरवठामंत्री १९७१-७३ मजूर व पुनर्वसन मंत्री आणि थोडा काळ आरोग्य व कुटुंब नियोजन मंत्री अशी भारताचे मंत्रीपद भूषित केले आजण कॅबिनेटच्या फेरबदलाच्या वेळी १ डिसेंबर १९७५ रोजी त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मातोश्रीच्या स्मरणार्थ “गिरावळ” येथे सुतिकागृह निर्माण करण्यांची त्यांची इच्छा होती.परंतु ७/३/१९७९ रोजी त्यांचे निधन झाल्याने ती इच्छा अपूर्ण राहिली. ००००
“त्यांनी १९६७ ते १९६९ पर्यंत लोकसभेचे चौथे उपसभापती, १९६९ ते १९७१ पर्यंत पुरवठा मंत्री आणि १९७१ मध्ये कामगार आणि पुनर्वसन मंत्री म्हणून काम पाहिले.सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते म्हणून, खाडिलकर यांनी १९३० ते १९४५ दरम्यान भारताच्या स्वातंत्र्य चळवळीदरम्यान अनेक काळ तुरुंगवास भोगला. ते १९३४ मध्ये काँग्रेस समाजवादी पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते आणि १९३६ मध्ये त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यांनी १९४८ मध्ये काँग्रेस सोडली आणि इतर सहकाऱ्यांसह अखिल भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाची स्थापना केली.१९५३ मध्ये ते त्याचे सरचिटणीस म्हणून निवडून आले.१९५५ मध्ये, त्यांनी सात डाव्या संघटनांचे युती असलेले अखिल भारतीय मजदूर किसान पक्ष स्थापन करण्यात प्रमुख भूमिका घेतली आणि केंद्रीय समितीचे सचिव संयोजक म्हणून निवडून आले.१९५७ मध्ये ते अहमदनगरमधून मजदूर किसान पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आलेले दुसरे लोकसभेचे सदस्य होते. १९६२ मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर, ते पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले, ज्यामुळे मजदूर किसान पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण झाले. काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांनी १९६२ आणि १९६७ मध्ये खेडमधून तिसऱ्या आणि चौथ्या लोकसभा निवडणुका जिंकल्या. १९७१ मध्ये त्यांनी बारामतीमधून पाचव्या लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या आणि केंद्रीय कामगार मंत्री झाले.”अशी माहिती उपलब्ध आहे. ०००० कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही,आर्थिक पाठबळ नाही पण केवळ आणि केवळ जिद्द व हुशारी या बळावर र.के. खाडीलकर देशसेवा, राजकारण व समाजसेवा करू शकले.यांचे जीवन म्हणजे एका महान कार्यक्षम कार्येकर्ता,नेता कसा असावा याचा वस्तुपाठ आहे.त्यांच्या स्मृतींना अभिवादन.! नारिंग्रे गावकरी व देवगडकर मंडळीनी त्यांचे एक स्मारक उभे करायला हवे. असे मला वाटते. —————————————-संदर्भ-१) खाडिलकर कुलवृत्तांत पृ.४३५,३६,३७) २)समाजमाध्मातील नोंदीवरून ३)विशेष सहकार्य- मा.प्रकाशअभ्यंकर (नारिंग्रे)











