माजगांव येथे दुचाकी घसरून पडल्याने तरुण गंभीर जखमी

सावंतवाडी: आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास माजगाव गरड येथील संजू टायरसमोर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात २३ वर्षीय सौरभ मालडकर (रा. सावंतवाडी) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी गोव्यातील बांबोळी येथे पाठवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ आपली दुचाकी घेऊन जात असताना अचानक त्याची दुचाकी स्लिप झाली आणि तो रस्त्यावर आदळला. या अपघातात त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्या रुपा गौडर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी सौरभला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव आणि लक्ष्मण कदम यांनीही मदतकार्यात सहभाग घेतला. सौरभच्या डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याला अधिक उपचारांसाठी गोव्यातील बांबोळी येथे हलवण्यात आले आहे.