सावंतवाडी । प्रतिनिधी : मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेची इमारत जीर्ण झाल्यामुळे इमारतीच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मळगाव हायस्कूलच्या १९८८-८९ एसएससी बॅचच्या विद्यार्थ्यांकडून प्रशालेला ५१ हजारांची मदत करण्यात आली.
मळगाव हायस्कूलच्या माजी विद्यार्थी परिवार या समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे ही रक्कम सुपूर्द करण्यात आली.
मळगाव इंग्लिश स्कूलची इमारत जीर्ण झाल्याने इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सद्यस्थितीत सुरू आहे. इमारतीच्या वर्ग खोल्यांची छप्पर दुरुस्ती सद्यस्थितीत हाती घेण्यात आली आहे. यापूर्वीच काही वर्गखोल्यांचे काम पूर्णही झाले आहे. या पार्श्वभूमीवर मळगाव इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवार या नावाने एक समिती गठीत केली आहे. या समितीच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांना प्रशालेच्या नूतनीकरणासाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर हायस्कूलच्या १९८८ – ८९ बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत प्रशालेच्या या कार्यासाठी ५१ हजारांची रोख मदत प्रशालेला केली. यावेळी माजी विद्यार्थी परिवार समितीचे पदाधिकारी शेखर पाडगावकर, प्रभाकर तेली, अर्जुन उर्फ भाऊ देवळी, संतोष नार्वेकर, महेश गावकर आदी पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक श्री. फाले सर, सावंत सर आदी यावेळी उपस्थित होते.
या प्रसंगी १९८८ – ८९ बॅचचे विद्यार्थी महेश खानोलकर, संतोष शिरोडकर, सतीश राऊळ, उदय फेन्द्रे, सचिन रेडकर, अर्जुन धुरी, दिनेश राऊळ, आत्माराम नाईक, रामा कोळेकर, प्रदीप सोनुर्लेकर, प्रतिभा राणे – राऊळ, आदी विद्यार्थी देखील उपस्थित होते.
यावेळी समितीचे पदाधिकारी तसेच माजी विद्यार्थी यामध्ये प्रशालेच्या विकासासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच इतर बॅचच्या विद्यार्थ्यांनी देखील यातून प्रेरणा घेऊन अशाच प्रकारे प्रशालेला मदत करावी असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.








