दोडामार्ग: प्रतिनिधी
साटेली-भेडशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सुमन डिंगणेकर यांच्याविरोधात सरपंच आणि आठ सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव अखेर बहुमताने मंजूर झाला. सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार राहुल गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सभेत हा निर्णय घेण्यात आला. या ग्रामपंचायतीच्या इतिहासात उपसरपंचांवर अविश्वास ठराव मंजूर होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
दोडामार्ग तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून साटेली-भेडशीकडे पाहिले जाते. ११ सदस्यसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये नेहमीच चढाओढ पाहायला मिळते. मागील आठवड्यात उपसरपंचांविरोधात अविश्वास ठराव दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
सोमवारी तहसीलदार राहुल गुरव यांच्या उपस्थितीत विशेष सभेचे आयोजन करून चर्चा व मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली. बैठकीस उपस्थित असलेल्या सरपंच छाया सखाराम धर्णे यांच्यासह चंद्रकांत मयेकर, विष्णू सुतार, सेजल धर्णे, दिपाली मोरजकर, शोभना जुवेकर, संपदा गवस, नीलपर्णा पार्सेकर आणि गणपत डांगी या आठ सदस्यांनी अविश्वासाच्या बाजूने हात उंचावून मतदान केले.
दरम्यान, उपसरपंच सुमन डिंगणेकर यांच्यासह सदस्य इस्माईल चांद आणि राजन सावंत हे तिघे या विशेष सभेला अनुपस्थित राहिले. सभेचे कामकाज पार पाडण्यासाठी ग्रामविकास अधिकारी ज्योती डोंगरदिवे, तलाठी स्मिता परब आणि महसूल कर्मचारी स्वप्नील देसाई यांनी सहकार्य केले.












