सावंतवाडी – एडुस्मार्ट इंक सावंतवाडीचा विद्यार्थी कु. चिराग पूजा राजेश चितारी याची मलेशियामध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय गणित व मानसिक अंकगणित (IAMAA) स्पर्धेसाठी फेरनिवड झाली आहे. ही स्पर्धा येत्या २ ऑगस्ट रोजी जोहर बाहरू, मलेशिया येथे होणार आहे.
भारतामधून केवळ ३५ मुलांची या स्पर्धेसाठी निवड झाली असून, जगभरातील सुमारे २००० स्पर्धक यामध्ये सहभागी होणार आहेत. चिरागसह एडुस्मार्ट इंकच्या ओरोस आणि कणकवली शाखेतील काही विद्यार्थीही या आंतरराष्ट्रीय स्तरावरील गणितीय स्पर्धेत आपले कौशल्य सादर करणार आहेत.
चिरागने अबॅकस आणि मानसिक अंकगणिताचे प्रशिक्षण सावंतवाडीतील भटवाडी येथील एडुस्मार्ट इंक संस्थेच्या संचालिका सौ. सपना पिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले आहे. चिरागच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.












