कोलगांव येथील कोरगावकर कुटुंबियांनी केले पूजन
सावंतवाडी । प्रतिनिधी : श्रावणमासी, नागपंचमीच्या पावन पर्वावर प्रत्यक्ष नागराजांचे दर्शन होणे हे केवळ दुर्मिळच नव्हे, तर अलौकिक मानले जाते. अशाच एका अविस्मरणीय घटनेने सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील रघुनाथ कोरगावकर कुटुंबीय धन्य झाले आहेत. मंगळवारी, नागपंचमीच्या मंगलदिनी दुपारी त्यांच्या घराच्या दारातच प्रत्यक्ष नागराज अवतरले आणि साक्षात ईश्वरी अनुभूतीचा सुखद धक्का त्यांनी अनुभवला.
नागपंचमीच्या दिवशी घराघरांत नागांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांची आराधना केली जाते. परंतु, खऱ्याखुऱ्या नागाचे घरात आगमन होणे हे क्वचितच घडणारे आणि अत्यंत शुभ मानले जाते. एरवी अनेकदा सर्पदर्शन होते; पण नागपंचमीच्या दिवशीच नागराजांनी घरात प्रवेश करणे हे दैवी संकेतासारखे आहे. आज कोलगाव येथील रघुनाथ कोरगावकर यांच्या निवासस्थानी हा दुर्लभ योग जुळून आला.
नागराजांनी घराच्या मागील बाजूने प्रवेश करत थेट पायरीवरून घरात आगमन केले. या अप्रतिम आणि विस्मयकारक दर्शनाने कोरगावकर कुटुंबीयांना अत्यानंद झाला. त्यांनी तात्काळ या नागराजांचे विधिवत पूजन केले आणि नागपंचमीचा हा दिवस त्यांच्यासाठी अविस्मरणीय बनला. ही घटना केवळ एक बातमी नसून, निसर्ग आणि अध्यात्म यांच्यातील अतूट नात्याची, तसेच श्रद्धा आणि विश्वासाची एक सुंदर प्रचिती आहे. नागराजांच्या या प्रत्यक्ष आगमनाने कोरगावकर कुटुंबियांना दैवी कृपेचा अनुभव मिळाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.












